गेटवर लवकर पाठव.. फोन बंद झाला अन्...; २० वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:12 IST2025-10-16T12:10:30+5:302025-10-16T12:12:38+5:30
ती नेहमीप्रमाणे बसने घरी परतत असे, मात्र त्या दिवशी ती घरी पोहोचली नाही. भावाने औषधालयात चौकशी केली असता

गेटवर लवकर पाठव.. फोन बंद झाला अन्...; २० वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून; परिसरात खळबळ
उरुळी कांचन - कोरेगाव मुळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील २० वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून गुन्हे शाखा तपासात सक्रिय आहे. मृत तरुणीचे नाव पूनम विनोद ठाकूर (वय २०, रा. गगन आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मुळ, मूळ गाव, उत्तर प्रदेश) असे असून ती उरुळी कांचन येथील एका आयुर्वेदिक औषधालयात काम करत होती.
अधिकच्या माहितीनुसार, मंगळवारी (१४ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहा वाजता पूनम कामावरून सुटली होती. ती नेहमीप्रमाणे बसने घरी परतत असे, मात्र त्या दिवशी ती घरी पोहोचली नाही. भावाने औषधालयात चौकशी केली असता, ती कामावरून निघाल्याचे समजले. यादरम्यान, तिने आपल्या मावस भावाशी शेवटचा फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी तिने सांगितले होते, सुजितला गगन आकांक्षा सोसायटीच्या गेटवर लवकर पाठव. त्यानंतर तिचा फोन बंद झाला. यानंतर कुटूंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
दरम्यान, शोधमोहीम सुरू असताना पूनमचा मोबाईल फोन, पाण्याची बाटली, पुरुषांचा बूट आणि एक सॅंडल गगन आकांक्षा सोसायटीजवळील प्रयागधाम रोडवर सापडली. संशय वाढल्याने कुटुंबीयांनी शोध अधिक तीव्र केला. शेवटी रस्त्यापासून सुमारे ३०० फूट अंतरावर मुरमाच्या दोन ढिगाऱ्यांमध्ये पूनमचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे व उरुळी कांचन पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पूनमला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास उरुळी कांचन पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेकडून सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास केला जात आहे.
न्यायासाठी नातलगांचे आंदोलन
पोस्टमार्टमनंतर पूनमचा मृतदेह नातलगांनी उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोर आणून “आम्हाला न्याय द्या” अशी मागणी केली. सुमारे एक तासाहून अधिक काळ रुग्णवाहिकेमध्ये मृतदेह ठेवून नातेवाईक व मित्रपरिवाराने आंदोलन केले. या वेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.