मुंबईच्या ५० लाखांच्या ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत पोलिसांकडून बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 17:42 IST2025-10-26T17:42:17+5:302025-10-26T17:42:49+5:30
- बारामती परिसरात असल्याची माहिती वसई विरार पोलिस आयुक्तालयातील पोलिसांनी बारामती तालुका पोलिसांना दिली होती.

मुंबईच्या ५० लाखांच्या ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत पोलिसांकडून बेड्या
बारामती : बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५० लाखांच्या एमडी ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला अखेर गजाआड केले आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळींज पोलिस ठाणे, नालासोपारा (ईस्ट), मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयात (दि. १४ सप्टेंबर) रोजी एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपी नामे शहबाज हमीद शेख, योगेश राजू राठोड, जफर आसिफ शेख, बाबू शेख आणि समीर शेख यांच्याविरुद्ध कारवाई सुरू होती. यापैकी समीर ऊर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख (२०, रा. वसई) हा फरार असून, बारामती परिसरात असल्याची माहिती वसई विरार पोलिस आयुक्तालयातील पोलिसांनी बारामती तालुका पोलिसांना दिली होती.
पथकाने शोधमोहीम राबवत तो बारामती शहरात वास्तव्यास असून, ‘ब्रॅण्ड रिव्हर’ या कपड्याच्या दुकानात काम करतो, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. यानंतर, पोलिसांनी हुशारीने आखलेल्या योजनेनुसार पथकाने पाहणी करत आरोपीची ओळख पटवली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला ताब्यात घेतले. बारामती पोलिस ठाण्यात चौकशीदरम्यान त्याने तुळींज पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे कबूल केले. तत्काळ मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयास माहिती देऊन आरोपीस त्यांच्या ताब्यात पुढील तपासासाठी सुपुर्द करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पवार, सहायक फौजदार सुरेंद्र वाघ, सुरेश बडे आणि पोलिस अंमलदार नीलेश वाकळे राहुल लांडगे यांच्या पथकाने केली. आरोपीस मीरा भाईंदर पोलिस, तुळींज पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राख, पोलिस हवालदार कांबळे व पोलिस कॉन्स्टेबल सोनवणे यांचे ताब्यात देण्यात आले.