पुणे - शहर पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई नवनाथ कांताराम शिंदे यांचा अमली पदार्थ विक्रेत्यांशी थेट आर्थिक संबंध असल्याचे उघड झाल्याने त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.अधिकच्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली. यावेळी ५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल झाला. मात्र, तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली जप्त केलेल्या गांजाशी संबंधित आरोपींशी स्वारगेट पोलीस ठाण्यातील नवनाथ शिंदे थेट संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले.
गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीच्या मोबाईलमध्ये शिंदे यांचा नंबर "एन.बी." या कोड नेमने सेव्ह करण्यात आला होता. चौकशीत आरोपींनी कबुली दिली की "नवनाथ भाऊ" हे सहकारनगर परिसरातील वसुलीचे काम पाहतात आणि अवैध धंद्यांना संरक्षण देतात. या तपासात स्पष्ट पुरावे मिळाल्यामुळे पोलिस आयुक्तांनी थेट NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बेशिस्त वर्तन व गैरप्रकारांमुळे शिंदे यांना विभागीय चौकशीच्या अधीन ठेवून निलंबित करण्यात आले आहे.अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ?पोलिसांना मिळालेल्या संदेशांनुसार शिंदे हे केवळ गांजा व्यवसायातच नाही, तर स्पा, पिठा, मटका, क्लब आदी अवैध धंद्यांमध्ये देखील भागीदार आहेत, अशी चर्चा होती. "पुणे शहरात बहुतांश अवैध धंदे बंद आहेत. मात्र, सहकारनगर परिसरात शिंदे यांच्या आशिर्वादामुळे अवैध धंद्यांना वाव मिळतो," असा मजकूरही संदेशात नमूद होता.