"माझा भाऊ चुकीच्या लोकांसोबत गेला, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार;आमदार मांडेकरांनी स्पष्ट सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:55 IST2025-07-24T14:54:47+5:302025-07-24T14:55:46+5:30

काल दुपारी मला पोलिस अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की, तुमच्या भावावर गुन्हा दाखल होत आहे. मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की, कायद्याप्रमाणे रीतसर कारवाई करा.

pune crime news My brother went with the wrong people, legal action will be taken against him; MLA Mandekar made it clear | "माझा भाऊ चुकीच्या लोकांसोबत गेला, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार;आमदार मांडेकरांनी स्पष्ट सांगितलं

"माझा भाऊ चुकीच्या लोकांसोबत गेला, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार;आमदार मांडेकरांनी स्पष्ट सांगितलं

पुणे/यवत  : दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील भोर-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना आज, २४ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर समाजमाध्यमांवर माहिती प्रसारित झाल्याने ३६ तासांनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन गोळीबाराची पुष्टी केली.

या प्रकरणाबाबत आमदार शंकर मांडेकर यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, काल दुपारी मला पोलिस अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की, तुमच्या भावावर गुन्हा दाखल होत आहे. मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की, कायद्याप्रमाणे रीतसर कारवाई करा. फिर्यादीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तर तो दाखल होईलच."

ते पुढे म्हणाले, चुकीचं काही घडलं असेल, तर मी हस्तक्षेप करणार नाही, मग माझा भाऊ या प्रकरणात असला तरीही त्यांच्यावर कारवाई होईल. माझ्या भावाकडे बंदुकीचा परवाना नाही. ज्याच्याकडे बंदूक आहे, त्याला पोलिस विचारतील. माझा भाऊ शेती आणि समाजकारणात सक्रिय आहे, तसेच तो वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे. कोणी कुठे जावं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. या घटनेत माझा भाऊ असला, तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईलच. आम्ही कोणावरही दबाव टाकलेला नाही."

आमदार मांडेकर यांनी पुढे सांगितले की, घटना घडल्यानंतर त्यांचा भाऊ सकाळी घरी आला, पण त्याने या घटनेबाबत काहीही सांगितले नाही. त्या वेळी ते स्वत: रस्त्याची पाहणी करण्यासाठी बाहेर गेले होते आणि गणेश जगतापही तिथे उपस्थित होते. माझा भाऊ चुकीच्या लोकांबरोबर गेला, हीच त्याची चूक आहे. ही घटना निंदनीय आहे आणि त्यावर कारवाई झालीच पाहिजे," असे मांडेकर यांनी ठामपणे सांगितले.

या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून, कायदेशीर कारवाईला गती दिली आहे. समाजमाध्यमांमुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आल्यानंतर पोलिसांवर दबाव वाढला होता. "चार भावांपैकी एक चोर असतो, एक देव असतो. पण चुकीची शिक्षा मिळेलच," असे मांडेकर यांनी शेवटी नमूद केले.

पार्टी लावण्यावरून वादाचा संशय

अंबिका कला केंद्रात सोमवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास रुईकरांची पार्टी होती. मात्र, त्याचवेळी संशयित आरोपी यांनीही त्या ठिकाणी पार्टी लावण्याचा आग्रह धरला. त्यातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. मंगळवारी या सर्व प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र पोलिसांनी कोणीही तक्रार द्यायला आले नाही म्हणून काहीही केले नाही. परंतु, ज्यावेळी आमदाराच्या भावाचाही समावेश असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर येऊ लागले, तेव्हा दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, ‘तिन्ही कलाकेंद्र चालकांचे जबाब नोंदवत आहोत. सीसीटीव्ही फुटेज तपासले; पण त्यामध्ये असे काही आढळून आले नाही.’ आम्ही दुसऱ्यांदा सीसीटीव्ही चेक करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
 

पोलिसांचे खबरी नेटवर्क झाले कमी

जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगार खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबारासारखे प्रकार करत आहेत. मात्र, एवढे सगळे होऊनही पोलिसांना माहिती मिळत नाही हे विशेष! कलाकेंद्रात गोळीबार झाला हे पोलिसांना माहीत नाही. विशेष म्हणजे तपासासाठी ते तक्रारीची वाट पाहत बसले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला त्यांचे खबरे ठरावीकच माहिती कळवितातर; मात्र, कलाकेंद्रातील गोळीबाराची माहिती कोणालाही कळली नाही, याचाच अर्थ पोलिसांचे खबरी नेटवर्क कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

 
आमदाराने घेतली पोलिस अधीक्षकांची भेट

मंगळवारी (दि. २२) पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या भेटीला एक आमदार गेले होते. ते नेमक्या कोणत्या कारणासाठी आले होते हे समजू शकले नसले तरी याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

Web Title: pune crime news My brother went with the wrong people, legal action will be taken against him; MLA Mandekar made it clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.