जमिनीच्या वादातून चाकणला एकाचा गळा चिरून खून; दोन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:28 IST2025-10-29T18:28:28+5:302025-10-29T18:28:47+5:30
- चालकाच्या जागेवर बसलेल्या मृतदेहाला रक्ताने भरलेल्या अवस्थेत आढळल्याने हा प्रकार समोर आला.

जमिनीच्या वादातून चाकणला एकाचा गळा चिरून खून; दोन जणांना अटक
चाकण : नाणेकरवाडी (ता. खेड) येथे एका तरुणाचा मोटारीतच गळा चिरून खून करण्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (दि. २८) सकाळी चालकाच्या जागेवर बसलेल्या मृतदेहाला रक्ताने भरलेल्या अवस्थेत आढळल्याने हा प्रकार समोर आला. खून झालेल्या तरुणाचे नाव विकास लक्ष्मण नाणेकर (वय ४४, रहिवासी सुदाम्याचे पोहे अपार्टमेंट शेजारी, नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड) आहे. या प्रकरणी नाणेकरवाडीचे पोलिस पाटील राजू शांताराम नाणेकर यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
या खूनप्रकरणी बबुशा ऊर्फ बाबाजी ज्ञानेश्वर नाणेकर (वय ४५, रहिवासी नाणेकरवाडी, ता. खेड) आणि योगेश सौदागर जाधव (वय २९, रहिवासी बबुशा नाणेकर यांची खोली, नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड) यांना अटक करण्यात आली आहे. नाणेकरवाडी ते एमआयडीसी रस्त्यावर ह्युंदाई कंपनीच्या मोटारीत (एमएच १४ एमक्यू ४७८३) विकास नाणेकर याचा गळा चिरून खून करण्यात आला.
याप्रकरणी चाकण पोलिसांत अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चाकण पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट ३ च्या टीमने तातडीने तपास सुरु केला. विकास नाणेकर यांचा खून करून पळालेले आरोपी मावळ तालुक्यातील नानोली भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नानोलीतून पुन्हा चाकणमध्ये असल्याचा अंदाज वर्तवला गेला. मावळ पोलिस कार्यालयातून निघालेल्या पोलिसांनी चाकण येथे शुभम बाळासाहेब भोसले यांच्या घरासमोरून बबुशा नाणेकर आणि योगेश जाधव यांना ताब्यात घेतले.
सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र नंतर दोघांना मावळ तालुक्यातून ताब्यात घेऊन युनिट ३ च्या कार्यालयात आणले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. विकास नाणेकर आणि बबुशा नाणेकर यांच्यात जमिनीचा वाद चालत होता. सोमवारी (दि. २७) दोघांमध्ये या वादावरून तणाव निर्माण झाला. त्या रागातून बबुशा नाणेकर आणि त्याचा साथीदार योगेश जाधव यांनी संगनमताने चाकूने विकास नाणेकर याचा गळा चिरून हत्या केली, अशी कबुली त्यांनी गुन्हे शाखा युनिट ३ कडून दिली आहे.