खोटा दस्त रद्द करण्यासाठी वकिलाची आठ लाखांच्या खंडणीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 12:25 IST2025-09-14T12:24:42+5:302025-09-14T12:25:15+5:30
या प्रकरणात पोलिसांनी माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

खोटा दस्त रद्द करण्यासाठी वकिलाची आठ लाखांच्या खंडणीची मागणी
सासवड : पुरंदर तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणुकीचे प्रकार नवीन नाहीत. याच पार्श्वभूमीवर सासवड येथील एका वकिलाने बनावट दस्त तयार करून लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वकिलासह त्याच्या पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.
पल्लवी आनंद सोनवणे (वय २८, रा. हडपसर, पुणे) यांनी सासवड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ॲड. सचिन जाधव (वय ४३) आणि अनुष्का सचिन जाधव (वय ३६, दोघेही रा. सासवड) यांनी संगनमताने वाघापूर (ता. पुरंदर) येथील वडिलोपार्जित व महारवतन मिळकतीच्या गट क्रमांक १३०३ आणि १३१३ मधील १८.५० गुंठे जमिनीची विसारपावती तयार केली. मात्र, नोंदणीकृत साठेखत दस्तामध्ये गट क्रमांक १३९६, १३०४, १३२२, १३२४, १३४६, १३५७, १३७२, १४०४, १४१५ चा उल्लेख करून बनावट दस्त तयार केला. यामुळे फिर्यादीची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले.
फसवणूक लक्षात आल्यानंतर फिर्यादीने बनावट दस्त रद्द करण्याची विनंती केली असता, आरोपींनी तब्बल ८ लाख रुपयांची खंडणी मागितली. याशिवाय, ॲड. सचिन जाधव याने फिर्यादीवर पिस्तूल ताणून जिवे मारण्याची धमकी दिली आणि जातीवाचक शिवीगाळ करत कार्यालयातून ढकलून बाहेर काढले. घाबरलेल्या फिर्यादीने अखेर सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांवर माहिती लपविण्याचा आरोप
या गंभीर प्रकरणाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असताना, सासवड पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप होत आहे. प्रसारमाध्यमांनी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी केवळ गुन्हा दाखल झाल्याचे सांगून पुढील माहिती देण्यास नकार दिला. यामुळे पोलिस आरोपींना पाठीशी घालत असल्याची शंका निर्माण झाली आहे. तपास पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे करत आहेत.