गुंड रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात; मुळशीतील आंदगावात सापळा रचून पहाटे घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 20:00 IST2025-10-28T19:59:47+5:302025-10-28T20:00:23+5:30
- संगणक अभियंता मारहाण प्रकरणात आठ महिने देत होता गुंगारा

गुंड रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात; मुळशीतील आंदगावात सापळा रचून पहाटे घेतले ताब्यात
पुणे : कोथरूड परिसरातील एका संगणक अभियंत्याला मारहाण करून गेले आठ महिने पोलिसांना गुंगारा देणारा गुंड गजानन मारणे याचा जवळचा साथीदार रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कोथरूड पोलिसांनी त्याला मुळशी तालुक्यातील आंदगावातून मंगळवारी पहाटे ताब्यात घेतले. दरम्यान, मकोका न्यायालयाने रुपेश मारणे याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
शिवजयंतीच्या दिवशी संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना गजा मारणे टोळीतील सदस्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गजा मारणे, रुपेश मारणे व इतरांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, जोग हे एका भाजप नेत्याचे कार्यकर्ते असल्याने नेते त्याला भेटण्यासाठी घरी गेले. त्यांनी संताप व्यक्त करत पोलिस आयुक्तांना फोन करून मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबतचा व्हिडीओ संबंधित नेत्यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला होता.
नेत्यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी गजा मारणे, रुपेश कृष्णराव मारणे (वय ४०, रा. शास्त्रीनगर, पौड रस्ता, कोथरूड) यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी गजा मारणे याच्यासह अनेकांना अटक केली. मात्र, रुपेश मारणे फरार झाला होता. तेव्हापासून रुपेश मारणे फरार होता. कोथरुड पोलिस व गुन्हे शाखेचे पथक रुपेश मारणेचा शोध घेत होते. मात्र, तो गेले आठ महिने पोलिसांना गुंगारा देत होता.
रुपेश मारणे हा मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका बंगल्यात राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास बंगल्याला वेढा घातला. तो पळून जाऊ नये, यासाठी सर्व बाजूने पोलिस अधिकारी व कर्मचारी साध्या वेषात सज्ज होते. पोलिसांनी रुपेश मारणे राहात असलेल्या घराचा दरवाजा वाजविला. त्यावेळी एका महिलेने दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश करत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याला सकाळी अटक करून मकोका न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली.
रुपेश मारणेवर अनेक गंभीर गुन्हे
रुपेश मारणे हा गजानन मारणे टोळीतील एक प्रमुख सदस्य आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न करणे, व्यावसायिकाचे अपहरण करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. व्यावसायिकाचे अपहरण करून ४ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी ३ वर्षांपूर्वी गजा मारणे, रुपेश मारणे यांच्यासह १५ जणांवर मोक्का कारवाई झाली होती. त्यावेळीही रुपेश हा अनेक महिने फरार होता. तेव्हाही त्याला मुळशी तालुक्यातून अटक करण्यात आली होती.