‘माहिती दे, नाहीतर गोळ्या झाडू’ न्यायालयात बंडू आंदेकरच्या वकिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप;नेमकं काय घडलं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 21:15 IST2025-09-16T21:14:50+5:302025-09-16T21:15:34+5:30
क्लासवरून आल्यानंतर घराच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करत असताना आयुषवर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता.

‘माहिती दे, नाहीतर गोळ्या झाडू’ न्यायालयात बंडू आंदेकरच्या वकिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप;नेमकं काय घडलं ?
पुणे : आयुष कोमकर खूनप्रकरणी पुणे पोलिसांना हवा असलेला कृष्णा आंदेकर मंगळवारी (दि.१६) सकाळी समर्थ पोलिसांना शरण आला. त्यामुळे बंडू आंदेकर टोळीचे प्रमुख चेहरे असलेले सर्वच जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने (दि.५) आयुष कोमकरचा खून केला होता. आयुषचा लहान भाऊ ए. डी. कॅम्प परिसरात खासगी क्लाससाठी गेला होता. त्याला घेण्यासाठी आयुष कोमकर गेला होता. क्लासवरून आल्यानंतर घराच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करत असताना आयुषवर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता.
याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर (वय ७०), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९) आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, सर्व रा. नानापेठ), तुषार नीलंजय वाडेकर (२७), स्वराज नीलंजय वाडेकर (२३), वृंदावनी नीलंजय वाडेकर (४०), अमन युसूफ पठाण (२५, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुलू मेरगु (२०, भवानी पेठ), यश सिद्धेश्वर पाटील (१९) आणि अमित प्रकाश पाटोळे (१९, दोघेही रा. नाना पेठ) अशा बारा जणांना अटक केली होती तर कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (४०) हा गेली ११ दिवस फरार होता. तो मंगळवारी (दि.१६) सकाळी समर्थ पोलिसांना शरण आला. पुढील तपासासाठी समर्थ पोलिसांनी त्याला गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. दरम्यान, कृष्णा आंदेकर शरण आल्याने आयुष कोमकर खूनप्रकरणी सर्व आंदेकर टोळीच जेरबंद झाली आहे.
घाबरूनच शरण आल्याची चर्चा :
बंडू आंदेकर टोळीच्या १२ जणांना न्यायालयात हजर केल्यानंतर बंडू आंदेकर याने कृष्णा आंदेकर याची माहिती दे, नाहीतर त्याला थेट गोळ्या झाडू, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी आरोपीने केलेले सर्व आरोप न्यायालयासमोर फेटाळले होते. मात्र, गोळ्या झाडू ही ही खबर कृष्णा आंदेकर याला लागल्याने तो घाबरून समर्थ पोलिसांसमोर हजर झाल्याची चर्चा आहे.