धायरीत मध्यरात्री टोळीकडून हाणामारी; वाहनांची तोडफोड, सीसीटीव्ही कॅमेरे फोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:26 IST2025-11-04T11:23:14+5:302025-11-04T11:26:07+5:30
- सुरुवातीला या टोळीतील एका तरुणाने पार्किंग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. त्यानंतर संपूर्ण टोळीने सोसायटीत प्रवेश करून जिन्याने वरच्या मजल्यांकडे धाव घेतली.

धायरीत मध्यरात्री टोळीकडून हाणामारी; वाहनांची तोडफोड, सीसीटीव्ही कॅमेरे फोडले
पुणे - शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकतीच धायरी परिसरात घडलेली एक घटना नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी ठरली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, हा प्रकार ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारास घडला. धायरीतील एका सोसायटीमध्ये रात्री अंदाजे १ वाजता ३ ते ४ तरुण हातात शस्त्रे घेऊन घुसले. सुरुवातीला या टोळीतील एका तरुणाने  पार्किंग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. त्यानंतर संपूर्ण टोळीने सोसायटीत प्रवेश करून जिन्याने वरच्या मजल्यांकडे धाव घेतली.
काही वेळाने खाली येऊन त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर शस्त्रांनी तुफान तोडफोड केली. या दरम्यान अनेक कार आणि दुचाकींचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर दहशत पसरवण्यासाठी टोळीकडून आणखी काही सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून त्यावरून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, परिसरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.