फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन मुलांना दारूचे वाटप; मनसेची धडक कारवाई;पब सील
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 13:25 IST2025-08-24T13:24:27+5:302025-08-24T13:25:18+5:30
लष्कर परिसरातील राज बहादुर मिल्स येथील पबमध्ये फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू पुरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन मुलांना दारूचे वाटप; मनसेची धडक कारवाई;पब सील
पुणे : लष्कर परिसरातील राज बहादुर मिल्स येथील किकी पबमध्ये फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू पुरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) कार्यकर्त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह थेट पबवर धडक देत ही पार्टी बंद पाडली.
ही कारवाई मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. विभागाध्यक्ष हेमंत बोळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस, व्हीव्हीआयटीसह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी १७ ते २१ वयोगटातील शेकडो तरुण-तरुणींना कोणतेही ओळखपत्र न पाहता थेट प्रवेश देत सर्रास दारू विक्री केली जात होती.
मनविसेला माहिती मिळताच त्यांनी उत्पादन शुल्क विभागाला कळवले. त्यानंतर पबमध्ये छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान अनेक अल्पवयीन मुले व मुली दारू पिताना आणि सिगारेट ओढताना आढळले. पब चालक व आयोजक यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने प्रशासनाने तातडीने पार्टी बंद करून पब सील केला. कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या आंदोलनात महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणी मनसेने कठोर भूमिका घेतली आहे. “फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीनांना व्यसनाधीन केले जाणार नाही. पुढे जर अशा पद्धतीने पार्टीचे आयोजन झाले आणि विद्यार्थ्यांना दारू पुरवली, तर संबंधित पबची एकही काच शिल्लक ठेवणार नाही, संपूर्ण पब उद्ध्वस्त केला जाईल, असा इशारा विभागाध्यक्ष हेमंत बोळगे यांनी दिला.