तारीख पर तारीख..! २७ वर्षांपासून जमिनीचा खटला न्यायालयात, पक्षकाराचे टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:52 IST2025-10-15T13:52:22+5:302025-10-15T13:52:49+5:30
जाधव हे गेल्या तब्बल २७ वर्षांपासून चालू असलेल्या जमिनीच्या वादाच्या प्रकरणात न्याय मिळत नसल्यामुळे मानसिक तणावाखाली होते

तारीख पर तारीख..! २७ वर्षांपासून जमिनीचा खटला न्यायालयात, पक्षकाराचे टोकाचे पाऊल
पुणे - एका ज्येष्ठ नागरिकाने न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून बुधवारी (दि. १५) पावणेबाराच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे न्यायालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली. या आत्महत्येमुळे सामान्यांना न्यायास लागणारा विलंब हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नामदेव यशवंत जाधव (वय ६१, रा. वडकी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे १९९७ सालापासून जमीनविषयक वाद सुरू होते. तेव्हापासून आजवर ही केस न्यायप्रविष्ट होती. मात्र दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रिया सुरू असूनही, त्यात त्यांना यश आले नव्हते. त्यामुळे ते तणावाखाली होते. त्यातून त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली. बुधवारी (दि. १५) सकाळी नामदेव जाधव हे शिवाजीनगर येथील न्यायालयात आले होते.
न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन त्यांनी उडी मारली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जाधव यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे न्यायालयाच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, शिवाजीनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. शिवाजीनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
आत्महत्येनंतर या ज्येष्ठ नागरिकाच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली. त्यात वडिलांनी कोणतीही जमीन दिली नाही. वडिलोपार्जित जमिनीविरोधात १९९७ मध्ये दावा दाखल केला होता. त्याच्या नावावर काही नाही, घरच्यांनीही काही दिले नाही. न्यायालयातही न्याय मिळत नाही. या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. - महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे