सावरगाव परिसरात चड्डी बनियन गँगचा धुमाकूळ;चार घरं फोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:35 IST2025-10-29T15:33:47+5:302025-10-29T15:35:27+5:30
या चोरीमध्ये चोरट्यांनी घरांचे दरवाजे तोडून कपाटे, पेट्या यांचे ताबे घेतले व अनेक साहित्य अस्ताव्यस्त करून दागिने आणि पैसे शोधण्याचा प्रयत्न केला

सावरगाव परिसरात चड्डी बनियन गँगचा धुमाकूळ;चार घरं फोडली
सावरगाव : सावरगाव परिसरातील गाढवेवाडी आणि खिलारवाडी येथील घरे मंगळवारी पहाटे चड्डी बनियन गँगच्या चोरट्यांनी फोडून ऐवज लंपास केला आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे अनेक लोक आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांना जातात. यामुळे दिवसभर बंद असलेल्या घरांची पाहणी करून रात्री चोरी केली गेल्याचे आढळते. या चोरीमध्ये चोरट्यांनी घरांचे दरवाजे तोडून कपाटे, पेट्या यांचे ताबे घेतले व अनेक साहित्य अस्ताव्यस्त करून दागिने आणि पैसे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना जेवढे दागिने आणि पैसे सापडले, ते सर्व लंपास केले गेले.
चोरट्यांनी सावरगाव येथील गाढवेवाडीत कारभारी सावळेराम गाढवे, बन्सी नारायण गाढवे आणि कैलास शिवाजी गाढवे यांच्या तिन्ही घरांत चोरी केली. तसेच खिलारवाडीत लक्ष्मीबाई विष्णू खिल्लारी यांच्या घरावरही चोरी झाली आहे. सावरगाव पंचक्रोशीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी लवकर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सावरगावचे पोलिस पाटील रुपेश जाधव यांनी तात्काळ जुन्नर पोलिस स्टेशनशी संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस बीट अंमलदार सागर शिंदे, हवालदार महेश भालेराव आणि पोलिस कॉन्स्टेबल बापू वाघमोडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी पोलिस पाटील रुपेश जाधव, खिलारवाडीचे सरपंच दिलीप खिलारी, सावरगाव ग्रामपंचायत सदस्य किरण गाढवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.