निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा फ्लॅट, गाडी हडपण्याचा प्रयत्न; अडीच वर्षाने आराेपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 20:49 IST2025-10-29T20:48:35+5:302025-10-29T20:49:17+5:30
- घर, गाडीसह दागिनेदेखील खाेटे, दस्तावेज बनवून गंडा घालण्याचा प्रयत्न उघडकीस

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा फ्लॅट, गाडी हडपण्याचा प्रयत्न; अडीच वर्षाने आराेपीस अटक
पुणे : भारतीय लष्करात वायुदलात विंग कमांडर पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला २०२२ मध्ये ब्रेन स्ट्रोक आल्याने ते मानसिकदृष्ट्या अस्थिर झाले होते. कुटुंब विभक्त राहत असल्याने याचा गैरफायदा घेत निवृत्त अधिकाऱ्याचा खासगी चालक व त्याच्या सासऱ्याने संगनमताने कट रचून अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर एका दिवसात बनावट कागदपत्रांचा वापर करून तीन वेगवेगळ्या बँक खात्यातून सुमारे ४० लाख रुपये परस्पर काढले. बँक लाॅकरमधून एक काेटीचे दागिने घेतले तसेच बनावट मराठी मृत्युपत्र व दस्तावेज तयार करून फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे संबंधितांची चारचाकी स्वत:च्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अखेर अडीच वर्षानंतर बावधन पाेलिसांनी आराेपीला अटक केली.
करण भाऊसाहेब पाटील असे आराेपी चालकाचे नाव असून, त्याचा सासरा गाेरक्ष ऊर्फ नाना कवडे यांनादेखील अटक करण्यात आली आहे. निवृत्त हवाई दलातील अधिकारी विंग कमांडर अरुण कुमार पाल यांच्या कुटुंबाची या आराेपींनी आर्थिक फसवणूक केली आहे. आराेपी करण पाटील हा त्यांचा खासगी चालक हाेता. चालकाने फसवणूक केल्याचा प्रकार अरुणकुमार पाल यांचा मुलगा अमिताव पाल यांच्या लक्षात मे २०२३ मध्ये आला. त्यानंतर त्यांनी याबाबत चालकावर फसवणूक व विश्वासघाताचा आराेप करत पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यावर आराेपी मागील दाेन वर्ष कुटुंबासह फरार हाेता.
आराेपीने यादरम्यान सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला हाेता. परंतु, सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने आराेपीला पाेलिस काेठडीची आवश्यकता असल्याचे नमूद करून जामीन नाकारला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला आवश्यकता असल्यास न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पाेलिस काेठडीची मागणी करण्याचा अधिकार राखून ठेवून अटकपूर्व जामीन मंजूर केला हाेता. याबाबत पाैड न्यायालयाने नुकतेच आराेपीला अटक करण्यास पाेलिसांना परवानगी दिली. या प्रकरणात आराेपीवर भादंवि कलम ३८१, ४०४, ४०६, ४२०, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गंभीर गुन्हे नाेंदवल्याचे निरीक्षण केले. अखेर याप्रकरणी बावधन पाेलिसांनी आराेपीचा शाेध घेऊन त्याला जेरबंद केले. पुढील तपास सहायक पाेलिस निरीक्षक ज्याेती तांबे करत आहेत.