दोन कोटींचं लग्न, फॉर्च्युनर, 55 तोळे सोने दिलं तरीही नवविवाहितेचा छळ;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 20:17 IST2025-12-13T20:15:07+5:302025-12-13T20:17:09+5:30
पतीने जबरदस्तीने गर्भपात घडवला, सासूने गरम तव्यावर हात भाजला, हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार व जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

दोन कोटींचं लग्न, फॉर्च्युनर, 55 तोळे सोने दिलं तरीही नवविवाहितेचा छळ;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
लोहगाव : पुणे शहरात एका नवविवाहित महिलेने (वय २६) तिच्या पतीसह सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ, अत्याचार, गर्भपात घडवणे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या सुखासाठी वडिलांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, तब्बल २ कोटी रुपये खर्च करुण लग्न लावले, हुंड्यात 'फॉर्च्युनर' कार आणि ५५ तोळे सोने दिले; तरीही सासरच्या मंडळींची पैशांची हाव काही केल्या संपली नाही. याच पैशाच्या हव्यासापोटी सुरू झाला २६ वर्षीय तरुणीचा अनन्वित छळ... पुण्यात हुंड्यासाठी एका २६ वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात सासऱ्यानेच सुनेचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
मरकळ (ता. खेड) येथील लोखंडे कुटुंबात हा प्रकार घडला आहे. विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २६ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यावरून पती आदित्य अनिल लोखंडे (वय २८), सासरे अनिल किसन लोखंडे (वय ५३), सासू सुवर्णा अनिल लोखंडे (वय ४८) आणि नणंद समृद्धी अनिल लोखंडे (वय २५) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी आदित्य लोखंडे (वय २६, लोहगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह आदित्य अनिल लोखंडे (वय २८, रा. मरकळ, ता. खेड) यांच्याशी २२ ऑगस्ट २०२३ रोजी लोहगाव येथे झाला होता. लग्नापूर्वीच, साखरपुड्याच्या वेळी सासरे अनिल किसन लोखंडे यांनी गोंधळ घालून अपमान केला होता. तसेच, सुरुवातीला आरोपींनी १०० तोळे सोने आणि मर्सिडीज जी वॅगन गाडी हुंडा म्हणून मागितली होती.
पीडितेच्या वडिलांनी टिळा, साखरपुडा आणि लग्न समारंभावर एकूण ₹२,२९,००,०००/- (दोन कोटी एकोणतीस लाख) खर्च केला होता. तसेच, आरोपींच्या मागणीनुसार लग्नात ५५ तोळे सोने, २ किलो चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फॉच्यूनर गाडी हुंडापोटी दिली होती. मात्र, लग्नानंतरही आरोपींनी वेळोवेळी पैशांची व सोन्याच्या दागिन्यांची मागणी सुरूच ठेवली. पतीने शेअर मार्केटमध्ये सुमारे ₹२ कोटींचे कर्ज केल्यामुळे, ते कर्ज फेडण्यासाठी सासरच्या लोकांनी पीडितेच्या माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. या मागणीवरून वडिलांनी एकूण ₹४५ लाख (₹१५ लाख रोख आणि ₹३० लाख कार लोनद्वारे) दिले होते.
लग्नानंतर काही दिवसातच पती आदित्यचा वाढदिवस आला. याचे निमित्त साधून सासरच्या मंडळींनी माहेरून आणखी पैसे आणि दागिने आणण्यासाठी विवाहितेचा छळ सुरू केला. वाढदिवसाला सोन्याचे कडे हवे म्हणून तगादा लावला. मुलीचा त्रास कमी व्हावा म्हणून वडिलांनी पुन्हा ४ तोळ्याचे सोन्याचे कडे, २५ हजारांचे घड्याळ आणि वाढदिवसाच्या खर्चासाठी ३५ हजार रुपये रोकड दिली. मात्र, तरी देखील 'आणखी पैसे घेऊन ये' असे म्हणत सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच ठेवला.
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पैशांच्या लोभापायी सासरच्यांनी माणुसकी सोडलीच, पण सासऱ्याने नात्याला काळीमा फासणारे कृत्य केले. सासरे अनिल लोखंडे यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.
विनयभंग, मारहाण आणि पिस्तुलाची धमकी
एका घटनेत, पती घरी नसताना सासरे अनिल लोखंडे यांनी पीडितेचा हात पकडून कमरेला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करून विनयभंग केला. हा प्रकार सासूला सांगितल्यावर तिने पीडितेला चारित्र्यावरून शिवीगाळ केली, केस ओढले आणि तिचा हात गरम तेलकट तव्यावर ठेवून भाजला.
त्यानंतर झालेल्या वादामध्ये सासऱ्यांनी आपल्या खोलीतून पिस्तुल आणून पीडितेवर ताणली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, पतीनेही माहेरी येऊन तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. अखेर सततच्या जाचाला आणि अपमानाला कंटाळून पीडितेने पोलिसांत धाव घेतली. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.