Pune Crime : नेपाळी नागरिकाने एटीएम कार्ड बदलत शेतकऱ्याचे ६५ हजार रुपये चोरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:29 IST2025-11-05T13:28:49+5:302025-11-05T13:29:03+5:30
नेपाळी नागरिकाने त्यांना ‘तुम्ही प्रयत्न करा’ असे सांगितले आणि त्यांचा पासवर्ड चोरी केला. त्यांनी दोन-तीन वेळा प्रयत्न केले, पण पैसे बाहेर येत नसल्याने ते बाहेर आले.

Pune Crime : नेपाळी नागरिकाने एटीएम कार्ड बदलत शेतकऱ्याचे ६५ हजार रुपये चोरले
डेहणे : राजगुरुनगर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पासवर्ड चोरून एटीएम कार्ड अडकत असल्याचा बहाणा करून ६५ हजार रुपये त्यांच्या खात्यातून चोरी करून काढल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी घडली. चलाखीने एटीएम कार्ड बदलून शेतकरी धोंडू बुधाजी तिटकारे यांच्या खात्यातील ६५ हजार रुपये लंपास केले.
तिटकारे आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी राजगुरुनगर येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम केंद्रावर गेले होते. तेव्हा एटीएम केंद्राच्या बाहेर एक नेपाळी नागरिक उभा होता आणि आतमध्ये त्याचा एक साथीदार उभा होता. तिटकारे आत गेले असता मशीनमधून पैसे बाहेर येत नव्हते. त्या नेपाळी नागरिकाने त्यांना ‘तुम्ही प्रयत्न करा’ असे सांगितले आणि त्यांचा पासवर्ड चोरी केला. त्यांनी दोन-तीन वेळा प्रयत्न केले, पण पैसे बाहेर येत नसल्याने ते बाहेर आले. काही मिनिटांनंतर बाजारात असताना त्यांच्या मोबाईलवर १०,००० रुपये विड्रॉल झाले असल्याचे पाच मेसेज आले. त्यांनी तत्काळ महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु त्यांनी त्यांना नुकसानीपासून वाचवण्यासाठी कोणताही प्रयत्न न करता, ‘तुमचे खाते डेहणे येथील शाखेत आहे, तिथे जाऊन संपर्क करा’ असे सांगून मदत करण्यास टाळाटाळ केली.
यानंतर त्यांना पुन्हा दोन मेसेज आले ज्यात प्रत्येकी ५,००० रुपये विड्रॉल झाले होते. ते एक तासाचा प्रवास करून डेहणे येथे गेले, त्यावेळी पुन्हा ५,००० रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यांनी तत्काळ डेहणे शाखेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपले खाते ब्लॉक केले. शाखेत त्यांना कळाले की, त्यांच्या जवळ असलेले एटीएम कार्ड सचिन बबन चोपडे या दुसऱ्या नावावर आहे. सुदैवाने त्यांनी या मोठ्या नुकसानापासून आपले खाते वाचवले. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी ते राजगुरुनगर पोलिस स्टेशनला गेले, मात्र ड्युटीवरील पोलिसांनी आदिवासी शेतकरी बुधाजी तिटकारे यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांना ६५ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.