राष्ट्रीय कबड्डी खेळाडू मुलीवर एकतर्फी प्रेमातून २२ वार करून निर्घृण खून; आरोपीला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:56 IST2025-12-17T11:55:25+5:302025-12-17T11:56:49+5:30
आरोपीने मुलीचा गळा चिरून तिचं धड शरीरापासून वेगळं करून निर्घृण खून केला होता

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू मुलीवर एकतर्फी प्रेमातून २२ वार करून निर्घृण खून; आरोपीला जन्मठेप
पुणे : बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे पंधरावर्षीय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू मुलीवर एकतर्फी प्रेमातून चाकूने व कोयत्याने २२ वार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला. घटनेनंतर चार वर्षांनी मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला.
शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १२ ऑक्टोबर २०२१ रोजी घडली होती. आरोपीने मुलीचा गळा चिरून तिचं धड शरीरापासून वेगळं करून निर्घृण खून केला होता. या प्रकरणात विशेष सरकारी वकील हेमंत झंजाड यांनी अशा क्रूर व्यक्तीला कोणतीही दयामाया न दाखविता आरोपीला फाशीची शिक्षा योग्य राहील व ही शिक्षा संपूर्ण समाजाला एक वेगळा आदर्श घालून देईल. त्यामुळे आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. साक्षीदारांनी दिलेली साक्ष व उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांच्या निकालाचे न्यायनिवाडे सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालय सादर करण्यात आले होते. त्यामुळे या खटल्याचा निकाल काय लागेल? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
न्यायालयाने सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतला. हा खटला दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरणांच्या श्रेणीत येईल असे मानणे कठीण होईल; पण सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार हा गुन्हा क्रूर होता. शवविच्छेदन अहवालानुसार मुलीच्या मृतदेहावर २५ छेदलेल्या जखमा आढळल्या. भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत आरोपी दोषी आढळला आहे. या गुन्ह्यासाठी मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा अशा दोनच तरतुदी आहेत. जन्मठेप हा नियम आहे आणि मृत्युदंड हा अपवाद आहे. मृत्युदंडाची शिक्षा देऊन हे अपवादात्मक प्रकरण म्हणून घोषित होणे हे माझ्या न्यायिक मनाला पटत नाही. त्यामुळे जन्मठेपेची शिक्षा ही आरोपीसाठी योग्य शिक्षा आहे असे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली. त्याबद्दल आम्ही नक्कीच समाधानी आहोत. या निकालामुळे समाजामधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विकृतीला आळा बसेल. महिला भगिनींनाही कायद्याचा खूप मोठा आधार आहे हे या निकालामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची नक्कीच सर्वजण जबाबदारी घेतील. - ॲड. हेमंत झंजाड, विशेष सरकारी वकील