माझं स्वप्न कृतीत उतरलं नाही, पण माझ्या अंगलट आलं; तोतया विंगकमांडर निघाला हॉटेलचा वेटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:02 IST2025-09-07T15:59:14+5:302025-09-07T16:02:15+5:30
- दौंडला बॅग चोरीची खोटी तक्रार देणाऱ्या व्यक्तीला अटक

माझं स्वप्न कृतीत उतरलं नाही, पण माझ्या अंगलट आलं; तोतया विंगकमांडर निघाला हॉटेलचा वेटर
दौंड : चेन्नई येथे भारतीय हवाईदलात (एअरफोर्स) विंग कमांडर असल्याचे सांगून दौंड रेल्वे स्थानकातून बॅग चोरीला गेल्याची खोटी तक्रार देणाऱ्या व्यक्तीला दौंड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. प्रत्यक्षात ही व्यक्ती विंग कमांडर नसून हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दौंड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता वासुदेव राज (वय ३२, रा. वरवंड, जि. बुलढाणा) याने २३ जानेवारी २०२३ रोजी दौंड रेल्वे स्थानकातून पहाटेच्या सुमारास आपली बॅग चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. त्याने तक्रारीत म्हटले होते की, बॅगेत ९ एमएमचे पिस्तूल, पासपोर्ट, हवाईदलाचा गणवेश आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. दत्ता राज याने सांगितले की, तो चेन्नई येथे हवाईदलात विंग कमांडर असून त्याची बदली पुण्यातील सदन कमांड येथे झाली आहे. तो चेन्नईहून पुण्याकडे येत असताना दौंड रेल्वे स्थानकात उतरला आणि प्लॅटफॉर्मवर झोपला होता. पहाटे जाग आल्यानंतर त्याने बॅग चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली.
पोलिस तपासातून उघड झाले सत्य
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, भारतीय हवाईदलाकडून दत्ता वासुदेव राज या नावाची कोणतीही व्यक्ती विंग कमांडर म्हणून कार्यरत नसल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिस पथकाने त्याच्या मूळ गावी, वरवंड (जि. बुलढाणा) येथे चौकशी केली. गावात आणि त्याच्या घरीही त्याने सर्वांना सांगितले होते की तो हवाईदलात विंग कमांडर आहे. मात्र, तो गावात आढळून आला नाही.
पोलिसांनी त्याच्या मोबाइलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता, तो सुरत येथे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याचे समोर आले. याशिवाय, त्याने महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही ठिकाणी वेटर आणि रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम केले होते. दौंड रेल्वे पोलिसांनी सुरत येथून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
स्वप्न अंगलट आलं
दत्ता राज याने पोलिसांना सांगितले की, त्याला हवाईदलात किंवा सैन्यात अधिकारी म्हणून काम करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे त्याने सर्वत्र स्वतःला विंग कमांडर म्हणून सांगितले आणि ही खोटी कहाणी रचली. “माझं स्वप्न कृतीत उतरलं नाही, पण माझ्या अंगलट आलं,” असे त्याने पोलिसांना सांगितले. दौंड रेल्वे पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाने खोटी तक्रार देण्याचे गंभीर परिणाम आणि बनावट ओळख रचण्याचे धोके अधोरेखित केले आहेत.