दुकानात महिलेसोबत गैरप्रकार; कपडे बदलताना व्हिडिओ काढल्याचा आरोप; मालक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 14:52 IST2026-04-08T14:52:03+5:302026-04-08T14:52:16+5:30
Pune Crime - या कृत्यामुळे पीडितेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दुकानात महिलेसोबत गैरप्रकार; कपडे बदलताना व्हिडिओ काढल्याचा आरोप; मालक अटकेत
पवनानगर - कामशेत येथील एका फॅन्सी दुकानात कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेचे गुप्तपणे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दुकानमालकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, 16 मार्चला सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास कामशेत येथील ‘मुकेश फॅन्सी कॉर्नर’ या दुकानात हा प्रकार घडला. दुकानमालक मुकेश मुथा (रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) यांनी पीडितेला कपडे बदलण्यासाठी स्टोअररूममध्ये पाठविले. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची माहिती असूनही, आरोपीने जाणीवपूर्वक पीडितेचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. या कृत्यामुळे पीडितेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीने पीडितेला दमदाटी केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोसरवर करीत असून, प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार हे काम पाहत आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुकेश मुथा यास अटक करून त्याला वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे.