पुणे : कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, हा आरोपी कुरिअर बॉय नसून पीडित तरुणीचा मित्रच असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. पीडितेने तक्रार देताना ही बाब पोलिसांपासून लपवून ठेवली होती. तसेच या घटनेमध्ये बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नसल्याचे देखील समोर आले आहे.आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मोबाइलमध्ये काढलेला सेल्फी संबंधित तरुणीनेच एका ॲपच्या माध्यमातून एडिट करून त्याखाली मेसेजही तिनेच लिहिला असल्याचे उघड झाले. तशी कबुली देखील तरुणीने पोलिसांना दिली. मात्र, तरुणाने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या म्हणण्यावर ती ठाम असल्याने, पोलिस लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे तरुणीने बोलवल्यानंतरच आपण तिच्या घरी गेल्याचा दावा या तरुणाने केला आहे.संगणक अभियंता तरुणीवर कुरिअर बॉयने बलात्कार केल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली होती. महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत काही संघटनांनी आंदोलनही केले होते. तर पोलिसांनी ही बाबा गांभीर्याने घेत तब्बल २२ पथके दिवस-रात्र तपासासाठी नेमली होती.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेला आरोपी एका मल्टी नॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला आहे. तो मागील एक वर्षापासून तरुणीच्या संपर्कात आहे. दोघांचा परिचय त्यांच्या समाजाच्या समाज मेळाव्यात झाला होता. त्यांचे एकमेकांशी फोनवर तसेच सोशल मीडियाद्वारे सातत्याने संपर्कात आहेत. तसेच तरुणाचे पीडितेच्या घरीही येणे-जाणे होते. तांत्रिक तपासात तो तरुणीला फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून अनेकदा खाद्यपदार्थ ऑर्डर करून पाठवत होता. घटनेच्या दिवशी तो सोसायटीतील सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याचे छायाचित्र पोलिसांनी दाखवल्यावर पीडितेने मात्र त्याला ओळखत नसल्याचे सांगितले. तिने असे का सांगितले? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
तो तिच्या सदनिकेत सव्वासातच्या सुमारास जाताना दिसत आहे. तर सदनिकेतून पावणेनऊच्या सुमारास बाहेर पडत आहे. तो बाहेर पडल्यावर सेल्फी एडिट केल्याचे आणि त्याखाली ‘मै वापस आउंगा’ असा मेसेज लिहिल्याचे तांत्रिक तपासात उघड झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो तरुणीच्या सांगण्यानुसारच तिच्या घरी आला होता. दोघांच्या संभाषणाचे काही व्हॉट्सॲप चॅटिंग देखील तरुणाच्या मोबाइलमधून पोलिसांना मिळाले आहे.