प्रेम केलं म्हणून मिळाली शिक्षा; खरपुडी प्रकरणात तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:06 IST2025-08-05T20:03:26+5:302025-08-05T20:06:54+5:30
प्राजक्ताच्या आई आणि भावाला या आंतरजातीय विवाहाला तीव्र विरोध होता. त्यांनी तिला वारंवार घरी परत येण्यास सांगितले, परंतु तिने नकार दिला.

प्रेम केलं म्हणून मिळाली शिक्षा; खरपुडी प्रकरणात तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
राजगुरूनगर : खरपुडी बुद्रुक, मांडवळा (ता. खेड) येथील आश्रमात पतीला मारहाण करून पत्नीचे अपहरण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींना ७ ऑगस्टपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुशीला राजाराम काशीद (वय ५०), अक्षय ऊर्फ गणेश राजाराम काशीद (३०, रा. खरपुडी बुद्रुक, ता. खेड) आणि योगीराज सुरेश करवंदे (२५, रा. पाबळ रोड, राजगुरूनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
खरपुडी येथील प्राजक्ता राजाराम काशीद ही मांडवळा येथील आश्रमातील दत्त मंदिरात दर्शनासाठी नियमितपणे जात असे. याच दरम्यान आश्रम चालक विश्वनाथ गोसावी यांच्याशी तिची मैत्री झाली, जी नंतर प्रेमात रूपांतरित झाली. दोघांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने आंतरजातीय विवाह केला. काही महिने मांडवळा येथील आश्रम सोडून ते बाहेरगावी राहत होते. प्राजक्ताच्या आई आणि भावाला या आंतरजातीय विवाहाला तीव्र विरोध होता. त्यांनी तिला वारंवार घरी परत येण्यास सांगितले, परंतु तिने नकार दिला.
दरम्यान, रविवारी (दि. ३ ऑगस्ट) दुपारी प्राजक्ताच्या आई, भावासह माहेरच्या इतर लोकांनी आश्रमातील तिच्या घरी येऊन तिला जबरदस्तीने घेऊन गेले. यावेळी तिचा पती विश्वनाथ गोसावी याला प्राजक्ताच्या भावासह इतरांनी मारहाण केली. या घटनेची तक्रार प्राप्त होताच खेड पोलिसांनी तातडीने कारवाई करत अपहरण झालेल्या प्राजक्ताचा शोध घेऊन तिन्ही आरोपींना अटक केली. खेड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.