Pune Crime : पोलिस आहेस तर आम्हाला पकडून दाखव; चोरट्यांनी पोलिसांना दिले होते चॅलेंज
By नितीश गोवंडे | Updated: July 31, 2025 10:39 IST2025-07-31T10:38:30+5:302025-07-31T10:39:05+5:30
कऱ्हाड येथून मुंबईला लिफ्ट मागून जात असलेल्या फोर्स वनच्या कमांडोला बोपदेव घाटात तिघांनी लुटले. कमांडोने असे करू नका, मी पोलिस आहे, असे म्हणताच तिघांनी ‘तू पोलिस आहेस तर आम्हाला पकडून दाखव’ असे आव्हान दिले.

Pune Crime : पोलिस आहेस तर आम्हाला पकडून दाखव; चोरट्यांनी पोलिसांना दिले होते चॅलेंज
पुणे : कऱ्हाड येथून मुंबईला लिफ्ट मागून जात असलेल्या फोर्स वनच्या कमांडोला बोपदेव घाटात तिघांनी लुटले. कमांडोने असे करू नका, मी पोलिस आहे, असे म्हणताच तिघांनी ‘तू पोलिस आहेस तर आम्हाला पकडून दाखव’ असे आव्हान दिले. चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. मात्र, त्यानंतर शहरातील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांनी हे आव्हान स्वीकारून तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियाच्या मदतीने चिकाटीने तपास करत चोरांना जेरबंद केले.
४ जून २०१५ रोजी फोर्स वन कमांडो असलेले एक कर्मचारी कऱ्हाड येथून मुंबईला जाण्यासाठी महामार्गावर उभे होते. रस्त्याने जात असलेल्या एका लाल रंगाच्या कारला त्यांनी लिफ्ट मागितली. कारमध्ये आधीपासूनच ३ जण होते. कारमध्ये बसून फोर्स वन कर्मचारी निघाले. थोड्याच वेळात त्यांना झोप लागली. काही वेळाने कार थांबल्याने त्यांना जाग आली, त्यावेळी कार बोपदेव घाट परिसरात होती.
कारमधील दोघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. आपल्यासोबत काय होतंय, हे कळण्यापूर्वी चोरांनी त्यांच्याकडील मोबाइल, बॅग, आयकार्ड आणि पैसे काढून घेतले. या झटापटीदरम्यान कर्मचाऱ्याने मी पोलिस आहे, असे सांगितले. त्यावेळी चोरट्यांनी ‘तू पोलिस आहेस तर आम्हाला पकडून दाखव,’ असे म्हणत पोबारा केला. कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून सासवड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फोर्स वनच्या तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी ही बाब पुणे शहर गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांना सांगितली. एका पोलिस कर्मचाऱ्यालाच मारहाण करून लुबाडण्यात आल्याने हा पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता. तत्कालीन एपीआय गवळी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीची माहिती काढण्यास सुरुवात केली.
सीसीटीव्ही, तांत्रिक तपास अन् कारची माहिती..
पोलिसांनी कऱ्हाड-मुंबई महामार्गावरील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपासाद्वारे संबंधित लाल रंगाच्या कारचा शोध लावला. त्यावेळी गवळी यांना ती कार येरवड्यातील एका व्यक्तीची असून ती चोरीला गेल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कारमालकाडे धाव घेतली.
मारहाण करून कार चोरली होती
संबंधित कारमालक आणि त्यांचा मेहुणा बीडला जात होते. त्यावेळी पाटोद्याजवळ संबंधित कारमालक आणि त्यांच्या मेहुण्याला मारहाण करून चोर कार घेऊन निघून गेले होते. त्यावेळी चोरांनी मेहुण्याचा मोबाइलदेखील चोरला होता.
चोरांच्या एका कॉलमुळे मित्रापर्यंत पोहोचले पोलिस
चोरांनी कारमालकाच्या मेहुण्याच्या फोनचा वापर करून शिक्रापूर येथील त्यांच्या एका मित्राला फोन केला होता. पोलिसांच्या तांत्रिक तपासात ही बाब समोर आली. त्या मित्राचे मोबाइलचे दुकान होते. त्याच्याकडे चौकशी केली असता चिटफंड चालवणाऱ्या दोघांची नावे (आरोपी) समोर आली. हे दोघे चोरीचे मोबाइल त्या मित्राला विकत होते. आरोपींपैकी एकजण एका बिल्डरकडे कामाला होता, तसेच तो रेकॉर्डवरील आरोपी देखील होता. लिफ्ट मागून गाडीत बसायचे, नंतर त्या गाडीमालकालाच लुटायचे, त्याची कार घेऊन पुढे काही दिवस हेच प्रकार करून, काही दिवसांनी कार रस्त्यावर सोडून द्यायची अशी त्यांची पद्धत होती.
मित्रानेच दिली होती रूम..
मोबाइल दुकानदार असलेल्या मित्रानेच या आरोपींना फुरसुंगी परिसरात एक रूम भाड्याने करून दिली होती. चोऱ्या, जबरी चोऱ्या केल्यानंतर आरोपी त्या रूमवर येऊन राहत असत. मोबाइल दुकानदार मित्राने त्याच्या मोबाइलवरून फुरसुंगी परिसरातील एका खानवळ चालवणाऱ्या महिलेला फोन केला होता. त्यामुळे ही बाब पोलिस तपासात समोर आली.
मध्यरात्री आवळल्या मुसक्या..
फोर्स वनच्या कर्मचाऱ्याला लुटण्याच्या घटनेला एक महिना होत आला होता. अद्यापपर्यंत चोर पोलिसांना सापडले नव्हते. पोलिसांनी फुरसुंगीतील आरोपी राहत असलेले घर हुडकून काढले आणि त्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांनी आरोपी रात्री उशिरा येतात अन् सकाळी लवकर बाहेर पडतात असे सांगितले. यानंतर सुनील गवळी यांच्यासह पोलिस पथकाने मध्यरात्री जात आरोपी रूममध्ये असल्याची खात्री करत आरोपींना पकडले. यावेळी आरोपी गेल्या १ वर्षापासून अशा प्रकारे लुटमार करत असल्याचे उघडकीस आले. या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील वेगवेगळे जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
आरोपींनी एकप्रकारे आम्हाला चॅलेंज दिले होते. आमच्यातीलच एकाला चोरांनी लुटले होते. त्यामुळे सहाजिकच आम्हीपण जिद्दीने तपास करीत होतो. यावरून एक बाब लक्षात आली की, कोणत्याही गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने, बारकाईने आणि जिद्दीने केला तर आरोपी जास्त काळ पोलिसांपासून लांब राहू शकत नाही. याच जिद्दीमुळे आजपर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. - सुनील गवळी, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा