विमानतळावर २ कोटी २९ लाखांचा हायड्रोपोनीक गांजा पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 10:42 IST2025-12-11T10:41:01+5:302025-12-11T10:42:05+5:30
- कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई

विमानतळावर २ कोटी २९ लाखांचा हायड्रोपोनीक गांजा पकडला
पुणे : अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई करत एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी लोहगाव विमानतळावर बँकाॅकहून आलेल्या एका प्रवाशाकडून २ कोटी २९ लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनीक गांजा जप्त केला.
लोहगाव विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटकडून नियमितपणे प्रवाशांची तपासणी केली जाते. नेहमीप्रमाणे तपासणी सुरू असताना ८ डिसेंबर रोजी बँकाॅकवरून आलेल्या इंडिगोच्या ६इ -१०९६ या विमानातील प्रवाशावर अधिकाऱ्यांना संशय आला. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करून साहित्याची तपासणी केली. त्यामध्ये दोन बंद पिशव्यांमध्ये २ हजार २९९ ग्रॅम उच्च प्रतीचा हायड्रोपोनीक गांजा आढळून आला. याबाबत प्रवाशाला विचारणा केली असता तो अडखळू लागला. पुढील चौकशीत अखेर त्याने हा माल स्वतःसोबत आणल्याची कबुली दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला अमली पदार्थ नियंत्रण आणि मन:प्रभावी द्रव्य कायदा, १९८५ अंतर्गत तत्काळ अटक केली.
नियंत्रित, कृत्रिम शेती पद्धतीत तयार होणारा हा गांजा अत्यंत तीव्र आणि महागडा असल्याने अमली पदार्थांच्या काळ्या बाजारात त्याला मोठी मागणी असून, या प्रकरणात आणखी कोणते व्यक्ती किंवा टोळ्या संबंधित आहेत का, याचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.