पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त शहरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक झाडाझडती मोहीम राबविण्यात येत आहे. याच दरम्यान वारजे परिसरात पोलिसांनी कारवाई करत २१ वर्षीय सागर मुंडे याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.
अधिकच्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलिसांनी सागर मुंडेला ताब्यात घेऊन अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी रात्री त्यांचे शहरात आगमन झाले आहे. आज शुक्रवारी (दि.४) एनडीएमधील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सकाळी ११:३५ वाजता होणार आहे.
पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून शहरातील वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बंडगार्डन वाहतूक विभागांतर्गत मोर ओढा ते सर्किट हाउस ते आयबी चौक यादरम्यानची एकेरी वाहतूक आवश्यकतेनुसार दुतर्फा करण्यात येणार आहे. यासह दुपारी १२:०० ते संध्याकाळी ०५:०० वाजेदरम्यान मंतरवाडी फाटा ते खडी मशीन चौक ते कात्रज चौक यादरम्यानच्या रस्त्यावरील सर्व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे.