Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 12:59 IST2025-08-01T12:59:20+5:302025-08-01T12:59:55+5:30
बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. काटेवाडीत बस थांबल्यानंतर हा प्रकार समोर आला.

Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
Baramati Crime News: बारामतीवरून इंदापूरला जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. बस बारामतीवरून इंदापूरला जात होती. काटेवाडीत गाडी आल्यानंतर रक्तबंबाळ प्रवासी बघून सगळ्यांनाच धक्का बसला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बारामती बस स्थानकातून बस इंदापूरसाठी निघाली होती. बसमध्ये प्रवाशांची संख्या भरपूर होती. हल्ला झालेला प्रवासी आणि हल्लेखोर दोघेही बसच्या मागच्या बाजूला बसले होते. बसमध्ये गर्दी असल्याने हल्लेखोराने आणलेला कोयता कुणाच्याही निदर्शनास आला नाही.
बसच्या वाहकाने सांगितले की, बस इंदापूरला निघाली होती. बसमध्ये बरीच गर्दी होती. मी तिकीट काढत बसच्या मध्यापर्यंत गेलो. मागे दोन प्रवासी बसलेले होते. पाठीमागे तिकीट काढणे बाकी होते. पाठीमागच्या सीटवर ते दोघे बसलेले होते.
त्या दोघांमध्येही काहीही शाब्दिक वाद झाला नाही. एकाने अचानक कोयता काढला आणि दुसऱ्या व्यक्तीच्या मानेवर सपासप वार करायला सुरूवात केली. काटेवाडी गावाजवळ हा सगळा प्रकार घडला. काटेवाडी बस थांबल्यानंतर जखमी प्रवासी उतरून रुग्णालयाच्या दिशेने पळत गेला.
बसमध्ये रक्ताचे डाग
कोयत्याच्या हल्ल्यात प्रवासी गंभीर जखमी झाला. हल्लेखोराने स्वतःवरही कोयत्याने वार केले आणि जखमी करून घेतले. दोघेही रक्तबंबाळ झाले. बसमध्ये सगळीकडे रक्ताचे उडाले.
जखमी प्रवासी आणि हल्लेखोर यांची माहिती अद्याप मिळालेली नाही. कोणत्या कारणामुळे हल्ला करण्यात आला हेही उघड झाले नाही.