आम्ही इथले भाई;गुंडांनी तरुणावर वार करुन ३ रिक्षांच्या काचा फोडून ५ दुचाकींचे केले नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:27 IST2025-10-31T18:27:24+5:302025-10-31T18:27:45+5:30
ही घटना कलवड वस्तीतील खेसे कॉर्नर येथे रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

आम्ही इथले भाई;गुंडांनी तरुणावर वार करुन ३ रिक्षांच्या काचा फोडून ५ दुचाकींचे केले नुकसान
पुणे : आम्ही इथले भाई, असे म्हणून तिघा गुंडांनी दहशत निर्माण करण्यासाठी तरुणावर कोयत्याने वार करुन ३ रिक्षांच्या काचा फोडल्या. तेथे उभ्या असलेल्या ५ दुचाकी पाडून त्यांचे नुकसान केले. याबाबत विनय नरेश अगरवाल (३४, रा. नागपूर चाळ, येरवडा) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गणप्या (रा. कलवड वस्ती), जोशवा विल्सन रत्नम (रा. विकासनगर, कलवड वस्ती) आणि आयान शेख (रा. कलवड वस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कलवड वस्तीतील खेसे कॉर्नर येथे बुधवारी (दि. २९) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय अगरवाल हे त्यांचा भाऊ हर्ष याच्यासोबत दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी लोहगाव येथील साठे वस्तीतील पेट्रोल पंपावर जात होते. कलवड वस्ती येथील खेसे पार्क कॉर्नरवरील इस्टरलीया सोसायटीसमोर तीन मुले शिवीगाळ करुन धमकी देत त्यांच्या अंगावर आली. त्यांच्यातील गणप्या याने त्याच्याकडील कोयता विनय अगरवाल यांच्या हातावर मारून जखमी केले. आम्ही इथले भाई आहोत, आम्ही सगळ्यांना मारून टाकू असे ओरडत दहशत पसरवली. कलवड वस्ती येथे उभ्या केलेल्या तीन रिक्षांच्या काचा कोयत्याने फोडून टाकल्या. ५ दुचाकी खाली पाडून त्यांचे नुकसान करुन दहशत निर्माण केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिंदे करत आहेत.