पुणे - सहकारनगर येथील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना पैलवानांनी धक्काबुक्की करत दगडाने हल्ला केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच सहकारनगर पोलिस ठाण्यावर काही सराईत गुंडांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये सराईत गुन्हेगाराने थेट पोलीस ठाण्यातच तोडफोड केली. खिडक्यांच्या काचा आणि कॉम्प्युटर फोडून मोठा गोंधळ घातल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
तोडफोड करणाऱ्या आरोपीचे नाव राजू उर्फ बारक्या लोंढे असे असून, तो सहकार नगर परिसरातील सराईत गुंड असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सहकारनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले होते. याचवेळी आरोपीने संतापाच्या भरात ठाण्यातील खिडक्यांच्या काचा फोडल्या तसेच कॉम्प्युटर उपकरणांचे नुकसान केले. या घटनेमुळे पोलीस दलाच्या सुरक्षिततेबाबत आणि कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.