पुणे - शहरात पुन्हा एकदा जुन्या भांडणाचा वाद उफाळून आल्याने रक्तरंजित हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळील प्लॉट नंबर ११ येथील सार्वजनिक संडासाजवळ गौरव गणेश तेलंगे याने अभिषेक गणेश स्वामी या तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात अभिषेक स्वामी गंभीर जखमी झाला असून त्याचा हात मंगटापासून पूर्णतः तुटला आहे. तसेच डोक्यातही गंभीर वार झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून त्यास तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत घटनास्थळीची पाहणी केली असून आरोपी गौरव तेलंगे याचा शोध सुरु करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी काही कारणावरून वाद झाला होता, त्याचाच राग मनात धरून हे हत्याराने हल्ल्याचे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही घटना घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
Pune Crime : जुन्या भांडणातून तरुणावर जीवघेणा हल्ला; एकाचा हात मनगटापासून तुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:43 IST