सोशल मीडियावर मैत्री, फसवणूक अन् धमकी देऊन उकळली खंडणी;तरुणीविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 20:11 IST2025-09-18T20:10:52+5:302025-09-18T20:11:47+5:30
- नांदेड, कंधारबरोबरच पुण्यातील तरुणांवर दाखल केले बलात्कार, ॲट्रॉसिटीचे गुन्हे, तरुणीविरोधात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर मैत्री, फसवणूक अन् धमकी देऊन उकळली खंडणी;तरुणीविरोधात गुन्हा दाखल
पुणे : सोशल मीडियावरून ओळख वाढवून तरुणाला आपल्या घरी बोलावून त्याला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले. त्यानंतर त्याला बलात्काराची खोटी केस दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पावणे दोन लाख रुपये उकळले. त्याने ५ लाख रुपयांची खंडणी न दिल्याने त्याच्याविरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल केला. या तरुणीने अशा प्रकारे कंधार आणि नांदेड येथील दोन तरुणांवर बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत आंबेगाव येथील एका ३१ वर्षांच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आळंदी रोडवरील म्हस्के वस्ती येथे राहणाऱ्या एका तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ नोव्हेंबर २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान या तरुणीच्या घरी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाशी या तरुणीने गोड बोलून त्यांच्याशी मैत्री प्रस्थापित करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करून स्वत:च्या संमतीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादी यांना बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून १ लाख १५ हजार ३६४ रुपयांच्या वस्तू व ५७ हजार ३०० रुपये रोख असे एकूण १ लाख ७२ हजार ६६४ रुपये जबरदस्तीने खंडणी स्वरूपात घेतले. त्यानंतर ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने त्यांच्याविरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात ८ फेब्रुवारी २०२५ रोजी फिर्यादीवर बलात्कार, ॲट्रॉसिटीसारखा गंभीर स्वरूपाचा खोटा गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर फिर्यादींनी चौकशी केल्यावर या तरुणीने अशाच प्रकारे २०१७ मध्ये नांदेड येथील एक तरुण व २०२२ मध्ये कंधार येथील एका तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवून स्वखुशीने शरीरसंबंध ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळली. त्यांच्याविरोधात देखील बलात्कार व ॲट्राॅसिटीचा गुन्हे दाखल केले आहेत. या तरुणीने आपल्या शरीराचा वापर करून फिर्यादी यांच्यासह इतरांची फसवणूक करून धमकी देऊन खंडणी उकळल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विश्वास भाबड पुढील तपास करीत आहेत.