वेल्हे : वेल्हे तालुक्यातील विंझर धनगरवस्ती येथे १६ वर्षीय गणेश गोसू चव्हाण याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत मुलाचे वडील गोसू नरसू चव्हाण यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ही घटना घडली. गणेश हा वडिलांनी "लहान मुलांमध्ये खेळू नको" असे खवळल्याने रागावला होता. याच रागाच्या भरात त्याने घरी कोणी नसताना गोठ्याजवळील चिंचेच्या झाडाला स्वतःला लटकवून घेतले. त्याची कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून आल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत मुलाच्या वडिलांनी तात्काळ वेल्हे पोलिस ठाण्यात माहिती कळवली.
पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गणेशला खाली उतरवून वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मांडके करीत आहेत.