चाकण : बाहेरील जिल्ह्यातून येऊन गाडी भाडे मारतोस काय? तीन हजार रुपये हप्ता महिन्याला हप्ता देत नाही, असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादीसह मित्रांना लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कडाचीवाडी (ता. खेड) येथे उघडकीस आला आहे.
अनिकेत अशोक / आसाराम चव्हाण (वय २०, कडाचीवाडी, चाकण, ता.खेड) याने चाकण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश कड (रा.कडाचीवाडी, चाकण, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबचालक अनिकेत हा मित्र रुतिक भास्कर, उल्हास गव्हाणे यांच्यासोबत (दि.१४) सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास कडाचीवाडी येथील गणपती मंदिराजवळील एका चहा टपरीवर चहा पित असताना महेश कड (एमएच १४/एलएल ०९१९ ) हा गाडीतून अचानक येऊन काही कारण नसताना तू बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन गाडीने भाडे मारतोस, असे म्हणत तीन हजार रुपये महिन्याला हप्ता देत नसल्याच्या कारणावरून फिर्यादीसह मित्रांना जीवे ठार मारण्याची धमकी देत हाताने आणि लाकडी बांबूने बेदम मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. पुढील अधिक तपास चाकण पोलिस करत आहेत.