दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकतकराची २७ कोटी थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 20:39 IST2025-04-05T20:38:32+5:302025-04-05T20:39:07+5:30
- महापालिका प्रशासनाची कारवाईकडे डोळेझाक

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकतकराची २७ कोटी थकबाकी
- हिरा सरवदे
पुणे : दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून एका गर्भवती महिलेवर उपचार करणे नाकारून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकतकर थकविला आहे. रुग्णालयाने २०१९ पासून महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही. तरीही सामान्यांच्या घरासमोर बँड वाजविणाऱ्या महापालिका प्रशासनाने रुग्णालयावर कारवाई न करता डोळेझाक केल्याचे समोर आले आहे.
लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनतर्फे चालविल्या जात असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून भरती करून घेतले नाही. तिला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी व विविध सामाजिक संस्थांनी रुग्णालयाच्या या कृतीचा निषेध करत रुग्णालयासमोर आंदोलन केले.
या घटनेचा राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे पैशांसाठी उपचार नाकारणाऱ्या या रुग्णालयाने मात्र, महापालिकेचा तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकतकर थकविला आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाने २०१९ वर्षापासून गेल्या सहा वर्षांत महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही.
सामान्य पुणेकरांनी कर थकविला, तर महापालिकेकडून थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवला जातो. मिळकत सील करून ती जप्त केली जाते, तिचा लिलाव केला जातो. असे असताना महापालिका प्रशासनाने मंगेशकर फाउंडेशनच्या थकबाकीकडे मात्र डोळेझाक केली आहे.
अशा प्रकारे रुग्णालयाने थकविला महापालिकेचा मिळकत कर
वर्ष - मिळकत कराची रक्कम (कोटींमध्ये)
२०१९ - ६५७६३९
२०२० - ४१०१०८९०
२०२१ - ४३६९७७५४
२०२२ - ६१८८७२४१
२०२३ - ५८९८४२०८
२०२४ - ६७६२५१४२
-----------------------------------------
एकूण - २७३८६२८७४
----------------------------------------