Pune Crime : व्हॉट्सॲपचा तो मेसेज बघताच खात्यातून गेले तब्बल ६२ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 09:26 IST2025-07-18T09:25:55+5:302025-07-18T09:26:10+5:30
चोरांनी दोघांची ६१ लाख ९७ हजार ७८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Pune Crime : व्हॉट्सॲपचा तो मेसेज बघताच खात्यातून गेले तब्बल ६२ लाख
पुणे : वारंवार सायबर चोरांच्या फसवण्याच्या पद्धती तसेच दररोज दाखल होत असलेले गुन्हे लक्षात घेऊनही नागरिक सायबर चोरांच्या आमिषाला बळी पडत आहेत. अशाच दोन वेगवेगळ्या प्रकरणांत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरांनी दोघांची ६१ लाख ९७ हजार ७८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत गुलटेकडी, मुकुंदनगर, स्वारगेट येथील २९ वर्षीय तरुणाला सायबर चोरांनी एप्रिल महिन्यात एका लिंकद्वारे वेबसाइटला रजिस्टर होण्यास सांगितले. त्यानंतर शेअर ट्रेडिंगसंदर्भात व्हॉट्सॲपद्वारे मेसेज करत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. या आमिषापोटी तरुणाने २५ लाख ३० हजार रुपये गुंतवले. त्यानंतर त्याला कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) भारमळ करत आहेत.
दुसऱ्या घटनेत सायबर चोरांनी बिबवेवाडी येथील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठाने ३६ लाख ६७ हजार ७८ रुपये गुंतवले. हा प्रकार २४ मार्च २०२३ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत घडला. गुंतवणुकीनंतर ज्येष्ठाला मूळ रक्कम अथवा कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.