व्हॉट्सॲप ग्रुपवर जातीवाचक शिवीगाळ; एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:03 IST2025-07-03T10:02:25+5:302025-07-03T10:03:02+5:30
हिंजवडी येथील आयट्रेंड होम्स सोसायटी येथे मंगळवारी (दि.१) रात्री पावणेएक ते पहाटे पावणेचार या कालावधीत ही घटना घडली.

व्हॉट्सॲप ग्रुपवर जातीवाचक शिवीगाळ; एकावर गुन्हा दाखल
पिंपरी : अनुसूचित जातीतील व्यक्तीविषयी व्हॉट्स ॲप ग्रुपवर जातिवाचक शिवीगाळ करत अपमानित केले. याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी येथील आयट्रेंड होम्स सोसायटी येथे मंगळवारी (दि.१) रात्री पावणेएक ते पहाटे पावणेचार या कालावधीत ही घटना घडली.
सौरव अशोककुमार सुमन (३८, रा. आय ट्रेंड होम्स, हिंजवडी फेज-२, ता. मुळशी, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ३७ वर्षीय व्यक्तीने मंगळवारी (दि. १) याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव सुमन यांचा एकाशी झालेल्या संवादाचा तपशील फिर्यादी व्यक्तीच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर टाकण्यात आला. या ग्रुपवरून संशयिताने फिर्यादी अनुसूचित जातीचे आहेत, हे दर्शविण्याच्या उद्देशाने जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली. या कृतीमधून फिर्यादी यांना अपमानित करण्यात आले. त्याचप्रमाणे, संशयित हा फिर्यादी यांच्या रूमवर आला. ‘पाहून घेतो’, अशी धमकीही त्याने फिर्यादीला दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुनील कुराडे तपास करत आहेत.