Video : कोंढव्यातील काकडे वस्तीत कोट्यवधींची रोकड जप्त, तिघांना ताब्यात
By किरण शिंदे | Updated: December 26, 2025 10:41 IST2025-12-26T10:41:10+5:302025-12-26T10:41:54+5:30
पोलिसांनी घरातील कपाट उघडताच सर्वांनाच धक्का बसला. या कपाटात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवलेली असल्याचे दिसून आले.

Video : कोंढव्यातील काकडे वस्तीत कोट्यवधींची रोकड जप्त, तिघांना ताब्यात
पुणे - पुणे - शहरातील कोंढवा परिसरातील काकडे वस्तीत अवैध दारूविक्रीवर कारवाई करताना पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. गल्ली क्रमांक दोनमधील एका घरावर छापा टाकला असता, दारू साठ्यासह तब्बल १ कोटी ८५ हजार ९५० रुपयांची रोख रक्कम पोलिसांना आढळून आली.
कोंढवा पोलिसांना काकडे वस्तीत अमर कौर उर्फ मद्रीसिंग दादासिंग जुनी (वय ५५) हिच्या घरी पुन्हा बेकायदा गावठी दारूची विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक आफ्रोज पठाण आणि त्यांच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
झडतीदरम्यान घरातील बेडरूममधील कपाट उघडताच पोलिसांना मोठ्या प्रमाणावर नोटांचे बंडल दिसून आले. रोकड इतक्या मोठ्या प्रमाणावर असल्याने पोलिसांनी तात्काळ नोटा मोजण्याचे मशीन मागवले. रात्री उशिरापर्यंत मोजदाद केल्यानंतर एकूण १ कोटी ८५ हजार ९५० रुपये इतकी रक्कम आढळून आली. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओही समोर आला असून त्यात पोलीस एका खोलीत रोकड मोजताना दिसत आहेत.
या प्रकरणी अमर कौर जुनी, दिलदारसिंग दादासिंग जुनी आणि देवाश्री जुनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रोकडचा स्रोत आणि अवैध दारूविक्रीशी असलेला संबंध याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. अमर कौर हिच्यावर यापूर्वीही बेकायदा दारूविक्रीप्रकरणी कारवाई झालेली आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आल्याने पोलिसांनी प्राप्तिकर विभागालाही याची माहिती दिली असून, काळ्या पैशांच्या व्यवहाराचा तपास होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे कोंढवा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.