Pune Crime : आंदेकर टोळीतील सराईताला घर भाड्याने देणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 19:17 IST2025-09-07T19:15:36+5:302025-09-07T19:17:02+5:30
- काळेला घर भाड्याने देऊन त्याबाबत पोलिसांना माहिती न दिल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Pune Crime : आंदेकर टोळीतील सराईताला घर भाड्याने देणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी धनकवडीतील आंबेगाव पठार येथे खोली भाड्याने घेऊन प्रतिस्पर्धी टोळीतील निकटवर्तीयांवर पाळत ठेवणाऱ्या दत्ता काळे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी नुकतीच अटक केली. काळेला घर भाड्याने देऊन त्याबाबत पोलिसांना माहिती न दिल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस कर्मचारी सारंग कर्डेकर यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी एका ३८ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला आंबेगाव पठार येथील गजानन कॉलनीत राहायला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घर भाड्याने देण्यापूर्वी याबाबतची माहिती पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक आहे, तसेच भाडेकरार करणेही बंधनकारक आहे. भाडेकरुंची नोंदणी न करता आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईचे आदेश विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी दिला आहे.
आंबेगाव पठार येथील पांडुरंगनगर भागात महिलेची चाळ आहे. या चाळीतील खोली ३० ऑगस्ट रोजी आंदेकर टोळीतील सराईत दत्ता बाळू काळे याला पाच हजार रुपये अनामत रक्कम घेऊन भाड्याने देण्यात आली. या खोलीचे दरमहा तीन हजार रुपये भाडे ठरले आहे. खोली भाड्याने दिल्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचा भाडेकरारनामा केला नाही. त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र, तसेच अन्य कागदपत्रे घेतली नाही. याबाबतची माहिती महिलेने पोलिसांना दिली नाही. दत्ता काळे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने आंबेगाव पठार भागात खोली भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी घर मालकिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.