दौंडमध्ये प्रेमविवाहामुळे तरुणाचा निर्घृण खून; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 19:54 IST2025-09-07T19:53:22+5:302025-09-07T19:54:12+5:30
माझा भाऊ केतन याने आमच्या घराजवळ राहणाऱ्या दीक्षासोबत एक वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. यामुळे दीक्षाच्या कुटुंबीयांचा आमच्यावर राग होता

दौंडमध्ये प्रेमविवाहामुळे तरुणाचा निर्घृण खून; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात
दौंड : प्रेमविवाह केल्याच्या रागातून दौंड येथील भीमनगर परिसरात केतन सुडगे (वय २२) या तरुणाची विटांनी मारहाण करून आणि पाठीत चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याप्रकरणी निखिल चितारे, विवेक कांबळे आणि विक्रांत कांबळे (सर्व रा. भीमनगर, दौंड) यांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
केतन आणि दीक्षा यांनी एक वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. याचा राग दीक्षाच्या नातेवाइकांच्या मनात होता. शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दीक्षाच्या नातेवाइकांनी केतनवर हल्ला चढवला. त्याला विटांनी बेदम मारहाण केली आणि एकाने त्याच्या पाठीत चाकू भोसकला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. केतनचा भाऊ अक्षय सुडगे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझा भाऊ केतन याने आमच्या घराजवळ राहणाऱ्या दीक्षासोबत एक वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. यामुळे दीक्षाच्या कुटुंबीयांचा आमच्यावर राग होता आणि ते सातत्याने आमच्याशी वाद घालत होते. शुक्रवारी रात्री मला कळाले की, माझ्या भावाला मारहाण होत आहे. आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा निखिल चितारे, विवेक कांबळे, विक्रांत कांबळे आणि एक अल्पवयीन मुलगा माझ्या भावाला मारहाण करत होता. आम्ही येताना पाहताच आरोपी पळून गेले.
अक्षय यांनी पुढे सांगितले की, त्यांनी केतनला तातडीने दौंड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे दौंड शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून, पुढील तपास सुरू आहे.