शिरूर तालुक्यातील उसाच्या शेतात ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; खुनाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 19:48 IST2025-08-20T19:47:50+5:302025-08-20T19:48:27+5:30

मृतदेहाच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा असल्याने प्राथमिक तपासात खुनाचा संशय बळावला

pune crime body of 50-year-old man found in sugarcane field in Shirur taluka; Murder suspected | शिरूर तालुक्यातील उसाच्या शेतात ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; खुनाचा संशय

शिरूर तालुक्यातील उसाच्या शेतात ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; खुनाचा संशय

कवठे येमाई  (पुणे जि.) -  शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गांजेवाडी-गणेशनगर परिसरात बुधवारी (दि. २०) सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय अंदाजे ५०) यांचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला असून त्यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवराम टेके मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घराबाहेर पडले होते. सकाळी साडेनऊ ते पावणेदहा वाजेपर्यंत त्यांचा मोबाईल सुरू होता. त्यानंतर तो बंद झाला आणि ते दिवसभर घरी परतले नाहीत. यामुळे नातेवाइकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला.

फाकटे गावातील एका तरुणाने टेके यांना मंगळवारी सकाळी कवठे येमाई-गणेशनगर रस्त्याने जाताना पाहिल्याचे सांगितले. बुधवारी सकाळी नातेवाइकांनी या परिसरात शोध घेतला असता, पोल्ट्री फर्मजवळ त्यांची दुचाकी सापडली. त्यानंतर सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळला.

मृतदेहाच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा असल्याने प्राथमिक तपासात खुनाचा संशय बळावला आहे. टेके यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे कवठे येमाई परिसरात भीती व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: pune crime body of 50-year-old man found in sugarcane field in Shirur taluka; Murder suspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.