राज्यात बंदी, तरी मावळात छमछम; लाखोंची उधळण..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 11:53 IST2025-12-13T11:52:37+5:302025-12-13T11:53:28+5:30
- पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; सोशल मीडियावर डान्स बारमधील व्हिडिओचा धुमाकूळ, 'अर्थ'पूर्ण सहकार्याशिवाय ते शक्य नाहीच

राज्यात बंदी, तरी मावळात छमछम; लाखोंची उधळण..!
पुणे : राज्यात डान्स बारला बंदी असतानादेखील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात छमछम सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. दररोज पोलिसांच्या नजरेसमोर याठिकाणी लाखो रुपयांची उधळण केली जात असल्याने, पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोशल मीडियावरदेखील डान्स बारमधील व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना देखील डान्स बार राजरोसपणे सुरू असल्याने ‘अर्थ’पूर्ण सहकार्याशिवाय असे होऊच शकत नसल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील कान्हे फाटा ते कामशेत पट्ट्यात मुख्य रस्त्यालगत तीन डान्स बार उघडपणे सुरू होत आहेत. रोज लाखो रुपयांची उधळण सुरू आहे. मात्र ग्रामीण पोलिसांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. येथील आमदारांनी काही दिवसांपूर्वी येथील अवैध उद्योगधंद्यांबाबत थेट वक्तव्य करत, यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतरही पोलिसांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मावळ परिसरात सुरू असलेल्या या डान्स बारमध्ये मद्यविक्रीसह अश्लील नृत्य, मुलींवर ग्राहकांकडून केली जाणारी लाखो रुपयांची उधळण खुलेआम केली जात असल्याचे दिसून आले. याठिकाणी पुणे शहराबरोबरच पिंपरी-चिंचवड येथून येणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. प्रत्येक बारमध्ये २३ ते ३० मुली डान्स करतात. त्या तरुणी ग्राहकांसमोर तोकड्या कपड्यांत नृत्य करताना दिसतात. पुणे जिल्ह्यातील वडगाव, मावळ, कामशेत परिसराची ओळख सध्या डान्स बारचे ‘प्रतिपनवेल’ झाले असून यामुळे गुन्हेगारी वाढण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अश्लील नृत्य, मोठ्या प्रमाणातील मद्यसेवन आणि मध्यरात्रीनंतरही सुरू राहणारा धिंगाणा यामुळे महामार्गावर अपघातांचा धोका निर्माण होत आहे.
लोणावळ्यात रात्री उशिरापर्यंत पार्ट्या
लोणावळ्यात देखील दररोज रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू आहेत. दररोज या ठिकाणी पार्ट्या रंगत आहेत. येथील पर्यटन पॉईंट्सवर रात्रीच्या वेळी हुक्का आणि मद्य विक्री मोठ्या प्रमाणत होत आहे. अशा स्थितीत स्थानिक नागरिक तत्कालीन पोलिस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची आठवण काढत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात हे सर्व अवैध प्रकार पूर्णपणे बंद केले होते. ते स्वत: कारवाई करण्यासाठी अग्रेसर असायचे मात्र, त्यांच्या बदलीनंतर येथील अवैध प्रकार पुन्हा जोरात सुरू झाल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
पोलिसांची मुद्दाम डोळेझाक
पिंपरी-चिंचवड येथे पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर तेथील अवैध व्यावसायिकांनी पुणे ग्रामीणकडे आपला मोर्चा वळवला होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या कार्यकाळात अवैध उद्योगधंद्यांवर पूर्णपणे आळा घातला होता. मात्र, आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध उद्योगधंदे तेजीत सुरू असल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत.