Pune Crime : धनकवडीत तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न; भोंदू ज्योतिषाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 15:10 IST2025-07-20T15:10:33+5:302025-07-20T15:10:46+5:30
तिच्या मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार ती आपल्या भावाची पत्रिका घेऊन १२ जुलै रोजी आरोपी ज्योतिषाकडे गेली होती.

Pune Crime : धनकवडीत तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न; भोंदू ज्योतिषाला अटक
पुणे : पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या एका भोंदू ज्योतिषाने तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना पुण्यातील धनकवडी भागात घडली आहे. अखिलेश लक्ष्मण राजगुरु (रा. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, सहकारनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अधिकच्या माहितीनुसार, २५ वर्षीय फिर्यादी तरुणीने सहकारनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी दिली आहे. तिच्या मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार ती आपल्या भावाची पत्रिका घेऊन १२ जुलै रोजी आरोपी ज्योतिषाकडे गेली होती. पत्रिका पाहिल्यानंतर ज्योतिषाने तुमच्या भावासाठी एक विशेष वनस्पती आणा आणि ती घेतल्यानंतर या,असे सांगितले.
दरम्यान, १८ जुलै रोजी ज्योतिषाने फिर्यादीला दुसऱ्या दिवशी वनस्पतीसाठी येण्यास सांगितले. १९ जुलै रोजी तरुणी त्या कार्यालयात गेली असता, आरोपीने ही वनस्पती तुमच्या डोक्यावर ठेवून मंत्र म्हणावे लागतील, असे सांगितले. त्याचवेळी तरुणीला संशय आल्याने ती निघण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपी अखिलेश राजगुरुने तिला मिठी मारून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तरुणीने तात्काळ आपल्या भावाला फोनवरून घटनेची माहिती दिली आणि सहकारनगर पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने आरोपीच्या कार्यालयावर छापा टाकून त्याला अटक केली. या घटनेनंतर धनकवडी परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी भोंदू ज्योतिषांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.