Pune Crime : तहसील कर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध क्रशर डंपर पळवून नेल्याचा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 10:55 IST2025-12-12T10:55:04+5:302025-12-12T10:55:42+5:30
ताब्यातील ७ लाख रुपये किमतीचा डंपर व अंदाजे १२ हजार रुपये किमतीचा क्रशर माल असे ७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाण्यात आला.

Pune Crime : तहसील कर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध क्रशर डंपर पळवून नेल्याचा प्रकार
नीरा : अवैध खनिज वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यावरच गुन्हेगारांनी हल्ला करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जेजुरी पोलिस ठाणे हद्दीत घडला असून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजे थोपटेवाडी हद्दीत अवैध क्रशर वाहतूक करत असलेल्या डंपरवर कारवाई करण्यासाठी जात असलेल्या महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी शरद मारुती लोंढे (वय ५१), रा. मांजरी बु. यांच्यावर दोन जणांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि.१०) दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास घडली. डंपर क्रमांक एम.एच. ११ डी.डी. ७०५७ अवैधरीत्या क्रशर माल वाहतूक करताना लोंढे यांनी तत्काळ कारवाई केली. मात्र, डंपरवरील अनोळखी चालक आणि नितीन वसंतराव निगडे, रा. गुळुंचे (ता. पुरंदर) यांनी लोंढे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या ताब्यातील ७ लाख रुपये किमतीचा डंपर व अंदाजे १२ हजार रुपये किमतीचा क्रशर माल असे ७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला असल्याने दोघांविरुद्ध जेजुरी पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी व पोलिस हावालदार कदम करीत आहेत.