Pune Crime : खंडणी प्रकरणात आंदेकर टोळी अडचणीत; शिवम आंदेकरसह सहा जणांवर गुन्हा दाखल
By किरण शिंदे | Updated: June 6, 2025 21:23 IST2025-06-06T21:21:34+5:302025-06-06T21:23:33+5:30
- शिवम आंदेकर आणि त्याचे साथीदार गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्याकडे दरमहा ५० हजार रुपये खंडणी मागत होते.

Pune Crime : खंडणी प्रकरणात आंदेकर टोळी अडचणीत; शिवम आंदेकरसह सहा जणांवर गुन्हा दाखल
पुणे - शहराच्या मध्यवस्तीतील नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या एका मासेविक्रेत्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी टोळीचा प्रमुख शिवम आंदेकरला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यासह पाच ते सहा साथीदारांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार ३८ वर्षीय मासेविक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मासे विक्रीचा स्टॉल नाना पेठेतील मच्छी मार्केट परिसरात आहे. शिवम आंदेकर आणि त्याचे साथीदार गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्याकडे दरमहा ५० हजार रुपये खंडणी मागत होते. पैसे न दिल्यास स्टॉल बंद पाडण्याची आणि जीवे मारण्याची धमकीही दिली गेली होती.
तक्रारदाराने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीच्या आधारे फरासखाना पोलिसांनी शिवम आंदेकरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शिवम आंदेकरला ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
फरासखाना पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत शिवम आंदेकरला अटक केली असून, त्याच्या टोळीतील अन्य सदस्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. मासेविक्रेत्यांकडून पैसे उकळण्याचा हा प्रकार गंभीर असून, या मागे आणखी कोणी गुन्हेगारी टोळी सक्रिय आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.
आंदेकर टोळीचा इतिहास
शिवम आंदेकर याचे नाव याआधीही काही किरकोळ गुन्ह्यांत आले असून, स्थानिक पातळीवर त्याच्या टोळीची दहशत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेनंतर मच्छी मार्केटमधील इतर विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.