वाघोली : पेरणे फाटा (ता. हवेली) फाटा येथील बनावट आधार केंद्रावर पेरणे ग्रामपंचायतीने केलेल्या लेखी तक्रारीवरून लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते व त्यांच्या पथकाने छापा टाकून आधार कार्ड यंत्रासह बनावट आधार कार्ड केंद्रावरील संपूर्ण साहित्य जप्त केले.
एकीकडे राज्यात बांगलादेशींना बनावट आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड दिल्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजत असताना छाप्यामुळे बनावट आधार केंद्र चालवणाऱ्या टोळीचे पितळ उघडे पडले आहे. अनेक बनावट आधार केंद्र चालकाचे धाबे दणाणले आहेत. पेरणे ग्रामपंचायतीने लेखी तक्रार केल्यानंतर पेरणे फाटा येथील 'राज सायबर कॅफे' येथे बनावट आधार केंद्र सुरू असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली होती.
तक्रारीवरून कोलते यांनी त्याच्या पथकासह राज सायबर कॅफेची तपासणी केली. त्यावेळी आधार केंद्रावर महिला व बालकल्याण विभागाची नोंदी असल्याचे दिसून आले.तथापि, महिला व बालकल्याणच्या अंगणवाडी सेविकेकडे हे आधारचे यंत्र नसल्याचे स्पष्ट झाले तसेच हे यंत्र चहोली येथे नोंदविलेले व प्रत्यक्षात पेरणे फाटा येथे चालवत असल्याचे आढळून आल्याने केंद्रावर कारवाई करण्यात आली.