Pune Crime : 'शंकर महाराज अंगात येतात' पुण्यातील दाम्पत्याची फसवणूक, घर, जमीन, संपत्ती सगळं गेलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:42 IST2025-11-05T11:42:32+5:302025-11-05T11:42:52+5:30
आजारपणाच्या उपचाराच्या नावाखाली घर, शेती आणि परदेशातील संपत्ती विकायला भाग पाडले

Pune Crime : 'शंकर महाराज अंगात येतात' पुण्यातील दाम्पत्याची फसवणूक, घर, जमीन, संपत्ती सगळं गेलं
पुणे - पुण्यात धार्मिक आडनावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शंकर महाराज अंगात येतात असा दावा करून एका दांपत्याची तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या दांपत्याने आपल्या मुलींच्या आजारपणावर उपाय होईल या आशेने आपली सर्व संपत्ती, घर, शेती आणि परदेशातील मालमत्ता विकून फसवणूक करणाऱ्यांना दिली.
अधिकच्या माहितीनुसार, पीडित दांपत्य हे खाजगी कंपनीत काम करणारे असून त्यांना दोन मुली आहेत. त्यातील एका मुलीस अलोपेशिया नावाचा आजार असल्याने तिचे केस कमी प्रमाणात येतात. या दांपत्याला भजन आणि धार्मिक कार्यक्रमांची आवड असल्याने ते वेळोवेळी अशा कार्यक्रमास जात होते. अशाच एका कार्यक्रमात त्यांची ओळख दीपक जनार्दन खडके या व्यक्तीशी झाली. खडके यांनी त्यांची ओळख वेदिका कुणाल पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली. वेदिका ही “शंकर बाबांची लेक” असून तिच्या अंगात शंकर बाबा येतात, असे सांगण्यात आले. ती सर्व समस्या सोडवेल, मुलींचे आजार बरे करेल, अशी खात्री या दांपत्याला देण्यात आली. यानंतर एका दरबारात वेदिकाने स्वतःच्या अंगात 'शंकर बाबा' आल्याचा अभिनय केला आणि त्या दांपत्याला मुलींच्या आजाराचे दोष दूर करण्यासाठी सर्व रक्कम माझ्याकडे द्या असे सांगितले. वेदिका पंढरपूरकरने त्यांना सांगितले की, घर आणि शेती विका, पैसे जमा करा, मुलींचा आजार बरा होईल. त्यामुळे त्या दांपत्याने परदेशातील घर, शेती, दागदागिने आणि संपत्ती विकून मिळालेल्या रकमेपैकी अंदाजे १४ कोटी रुपये वेदिका आणि तिच्या सहकाऱ्यांना दिले.
दरम्यान, फसवणुकीची मालिका तीन वर्षे सुरू होती वेदिकाने त्यांना घरात सुपारी, नारळ, दगड यांसारख्या वस्तू ठेवायला सांगून ही शेवटची पूजा आहे असे सांगत फसवणूक सुरूच ठेवली. मात्र, तीन वर्षे उलटूनही मुलींची तब्येत बरी झाली नाही. अखेर दांपत्याला हे सर्व एक फसवणुकीचे जाळे असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार दिली.
दांपत्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,आम्हाला खोटी माहिती देऊन, ‘शंकर बाबा’ अंगात येतात असा भास करून आमचा विश्वास संपादन केला. खोट्या आश्वासनांवर आमच्या मालमत्ता विकायला लावून, रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यास सांगून आमची सुमारे १३ ते १४ कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.