सोन्याचा हंडा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 10:10 IST2025-07-17T10:07:08+5:302025-07-17T10:10:20+5:30
याप्रकरणी कोथरूडमध्ये राहणाऱ्या व घरकाम करणाऱ्या महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिलेची मैत्रीण गेल्या वर्षापासून भोंदूबाबा मदारी याच्याकडे जात होती. तिच्याकडूनच फिर्यादीला बाबाबद्दल माहिती मिळाली.

सोन्याचा हंडा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
पुणे : आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा हंडा मिळवून देतो, असे आमिष दाखवून महिलेची फसवणूक झाल्याची घटना शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी सापळा रचून एका भोंदूबाबाला कोरेगाव पार्क पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
महंमद खानसाहेब जान मदारी (रा. कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूडमध्ये राहणाऱ्या व घरकाम करणाऱ्या महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिलेची मैत्रीण गेल्या वर्षापासून भोंदूबाबा मदारी याच्याकडे जात होती. तिच्याकडूनच फिर्यादीला बाबाबद्दल माहिती मिळाली. फिर्यादी महिला विधवा असून त्यांना दोन मुले आहेत. घरची आर्थिक चणचण दूर व्हावी, असे तिला वाटत होते. ही बाब मदारी बाबासमोर बोलून दाखविल्यानंतर त्याने आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा हंडा मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी पूजेसाठी दोन लाख ६० हजार रुपये घेतले.
पंधरा दिवसांपूर्वी त्याने आपल्या घरी पूजा मांडून फिर्यादी महिलेस एक मातीचे मडके व त्यावर काळ्या रंगाचे कापड बांधून दिले, तसेच ते कापड १७ दिवसांनी रात्री ११ वाजून २१ मिनिटांनी उघडण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी महिलेने मडक्यावरील कापड काढले असता, काहीच आढळले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने मदारीला फोन केला, तसेच याबाबत पोलिसांना कळविले. मदारीने फिर्यादीला मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजता घरी बोलावले, त्यावेळी पोलिसांनी सापळा लावून मदारीला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली.