महिलेला विविध पूजा केल्यानंतर मूल होईल; अघोरी विद्या करणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:43 IST2025-09-11T15:43:33+5:302025-09-11T15:43:50+5:30

- एक दिवशी ती गावाला गेल्यानंतर तिला गावाकडील एका व्यक्तीने आळंदी येथील देवऋषीबाबाबद्दल माहिती दिली.

pune crime a fake father who practiced Aghori education to get a child is chained | महिलेला विविध पूजा केल्यानंतर मूल होईल; अघोरी विद्या करणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

महिलेला विविध पूजा केल्यानंतर मूल होईल; अघोरी विद्या करणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

पुणे : महिलेला विविध पूजा केल्यानंतर मूल होईल असे आश्वासन देऊन अघोरी विद्या करून पेढ्यातून अंगारा खाण्यास दिला. त्या बदल्यात पैसे व दागिने घेऊन तब्बल तीन लाख १५ हजार रुपयांचा अपहार करणाऱ्या भोंदूबाबाला सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गिरीष बलभीम सुरवसे (वय ३६, रा. शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे.

या प्रकरणी एका २६ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून भोंदूबाबावर महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्याच्या विविध कलमान्वये व अपहार केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ जुलै ते ९ सप्टेंबर या कालावधीत घडला. पीडित महिला ही बालाजीनगर परिसरात राहण्यास असून, तिच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. तिने मूलबाळ होण्यासाठी वैद्यकीय उपचार घेऊनही तिला मूल होत नव्हते. एक दिवशी ती गावाला गेल्यानंतर तिला गावाकडील एका व्यक्तीने आळंदी येथील देवऋषीबाबाबद्दल माहिती दिली.

मूल होईल या आशेने तिने सासरी न सांगताच त्या भोंदूबाबाकडे जाणे सुरू केले. त्याने मूल होईल असे तिला आश्वासन देऊन अंगारा धुपारे करण्यासाठी तिच्याकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळले. सरतेशेवटी त्याने तिला पेढ्यातून अंगारा खाण्यास दिला. यावरही तो थांबला नाही. त्याने तिच्याकडे पैशाची मागणी सुरूच ठेवली. महिलेने शेवटी तिच्याकडील मंगळसूत्र विकून त्या भोंदूबाबाला पैसे दिले. जेव्हा महिला घरी आली तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला मंगळसूत्राबाबत विचारणा केली. तेव्हा तिने मूल होण्यासाठी अंगारा धुपाऱ्याला मंगळसूत्र विकल्याचे सांगितले. सर्व फसवणुकीचा प्रकार तिच्या सासऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दिली. या प्रकरणात आरोपीचा शोध घेऊन त्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणात भोंदूगिरी करणाऱ्या आरोपीला आमच्या पथकाने अटक केली आहे. महिलेला या भोंदूबाबाकडे घेऊन जाणाऱ्यालाही या प्रकरणात आम्ही आरोपी केले असून, त्यालाही या प्रकरणात लवकर अटक केली जाईल. दरम्यान, आरोपीने यापूर्वी अशा पद्धतीने किती जणांना फसवले आहे याचाही शोध सुरू असल्याची माहिती सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली.

Web Title: pune crime a fake father who practiced Aghori education to get a child is chained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.