सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवत बुलेट शोरूममधील ७ लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 19:32 IST2025-08-20T19:32:08+5:302025-08-20T19:32:57+5:30
पुणे : सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवत वाकडेवाडी, शिवाजीनगर येथील एका बुलेट शोरूममधून चोरट्यांनी मंगळवारी (दि.१९) सात लाख अकरा हजार ...

सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवत बुलेट शोरूममधील ७ लाख लुटले
पुणे : सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवत वाकडेवाडी, शिवाजीनगर येथील एका बुलेट शोरूममधून चोरट्यांनी मंगळवारी (दि.१९) सात लाख अकरा हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरी केली. या प्रकरणी सुरक्षारक्षक इंद्रसेन जाचक (४५, रा. बावधन) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ब्रह्मा मोटर्स या बुलेटच्या शोरूममध्ये हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाचक हे संबंधित शोरूममध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. मंगळवारी पहाटे ते कामावर असताना, चोरटे तेथे आले. त्यांनी जाचक यांना शस्त्राचा धाक दाखवला. त्यानंतर काउंटर टेबलचे ड्रॉव्हर जबरदस्तीने काढून सात लाख अकरा हजार रुपयांची रोकड काढून घेतली. यावेळी चोरट्यांनी सुरक्षारक्षकाला ठार मारण्याची धमकी देत तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, खडकी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.