अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २८ वर्षीय महिलेवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 19:42 IST2025-07-06T19:41:15+5:302025-07-06T19:42:08+5:30
- पेठ गावच्या माजी सरपंचासह सावकार मित्रावर गुन्हा दाखल

अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २८ वर्षीय महिलेवर अत्याचार
उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील पेठ (ता. हवेली, जि. पुणे) येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय महिलेला तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी दोघांविरोधात उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पेठ गावचे माजी सरपंच सुरज भालचंद्र चौधरी आणि त्याचा सावकार मित्र राजेश लक्ष्मण चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणात पीडित महिलेने उरुळी कांचन पोलिसात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश लक्ष्मण चौधरी याने पीडितेचे अर्धनग्न अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला.
राजेश याने पीडित महिलेला घेतलेले ५ ते ६ लाख रुपये परत दे, अन्यथा नवरा आणि मुलाला मारून टाकील, अशी धमकी दिली. पीडित महिलेने त्याला आत्तापर्यंत एकूण १२,५०,००० रुपये रक्कम दिली आहे. त्याने वेळोवेळी विविध ठिकाणी नेऊन पीडितेच्या इच्छेविरोधात बलात्कार केला आहे.
पेठ गावचे माजी सरपंच सुरज भालचंद्र चौधरी यांनी पीडितेला २८ एप्रिल २०२५ रोजी फोन करून, “महत्त्वाचे बोलायचे आहे,” असे सांगून लोणीकंद येथे बोलावून घेतले व राजेशकडील अश्लील फोटो दाखवतो असे सांगून, पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिला एका हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. या प्रकरणाचा संपूर्ण तपास उरुळी कांचनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा म्हटले करीत आहेत.