आंदेकर टोळीतील गुंडाच्या घरातून २ पिस्तुलासह ३७ लाखांचा ऐवज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:30 IST2025-12-17T11:29:59+5:302025-12-17T11:30:40+5:30
- पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हे दाखल

आंदेकर टोळीतील गुंडाच्या घरातून २ पिस्तुलासह ३७ लाखांचा ऐवज जप्त
पुणे : बंडू आंदेकर याच्या टोळीतील गुंडाच्या घरावर पुणे पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून २ पिस्तुले, १ एअरगन, १७ लाखांची रोकड, १८ लाखांच्या चांदीच्या वस्तू व इतर वस्तू असा ३७ लाख ४७ हजार ९४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक करून एका अल्पवयिनास ताब्यात घेतले आहे. तन्मय गणेश कांबळे (२३, रा. गणेश पेठ) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
आयुष कोमकर याचा खून झाल्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये समर्थ पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी २ लाखांची रोकड, ८५ लाखांचे ७० ग्रॅम सोन्याचे दागिने (७७ तोळे) तसेच साठेखत, पॉवर ऑफ अटर्नी, बँकेचे पासबुक, एक कार, विविध करारनामे, टॅक्स पावत्या सापडल्या होत्या. त्यातील कागदपत्रांचा तपास केल्यावर बंडू आंदेकर व त्याच्या टोळीवर काही खंडणीचे आणखी गुन्हे दाखल झाले आहेत. आंदेकर टोळीची दहशत संपविण्याचा पुणे पोलिसांनी निर्धार केला आहे. त्यात महापालिका निवडणुकीमध्ये बंडू आंदेकर व त्याचे पुत्र उतरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तन्मय कांबळे याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती समर्थ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तन्मय कांबळेला ताब्यात घेतले. शस्त्राबाबत चौकशी केल्यावर त्याने अल्पवयीन मुलाकडे दिल्याचे सांगितले. त्या मुलाला पकडून पोलिसांनी चौकशी केल्यावर ते पिस्तूल आंदेकर टोळीतील गुंड स्वराज वाडेकर याच्या घरात ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार समर्थ पोलिस, गुन्हे शाखा युनिट १, खंडणी विरोधी पथक यांनी संयुक्तपणे आंदेकर टोळीतील स्वराज वाडेकर याच्या घरावर छापा मारला. त्यात २ पिस्तूल, १ एअरगन, १५ लाख रुपयांची रोकड, १८ लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू असा ३७ लाख ४७ हजारांचा माल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते अधिक तपास करीत आहेत.