खळबळजनक! पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे रिव्हॉल्व्हर चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 14:22 IST2021-12-30T14:22:22+5:302021-12-30T14:22:37+5:30
कारचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने त्यातील एक लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन नेले.

खळबळजनक! पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे रिव्हॉल्व्हर चोरीला
पुणे : काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना चोरट्याने हिसका दाखविला आहे. त्यांच्या कारचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने त्यातील एक लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन नेले.
याप्रकरणी रमेश बागवे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहियानगर, गंज पेठ ते भवानी पेठेतील अरुणकुमार वैदय स्टेडियम दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. नेमका चोरीचा हा प्रकार कसा घडला, याबाबत बागवे यांना समजू शकलेले नाही. त्यांनी आपले रिव्हॉल्व्हर कारमधील ड्रायव्हर सीटचे शेजारील सीटच्या मागील कप्प्यामध्ये ठेवले होते. चोरट्याने बागवे यांच्या कारची बनावट चावी तयार करुन किंवा कारचा दरवाजा उघडून कारमधील सीटमागील कप्प्यात ठेवलेले १ लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन नेले.
याबाबत रमेश बागवे यांनी सांगितले की, आपण कारमधील सीटच्या मागील कप्प्यात रिव्हॉल्व्हर ठेवले होते. २८ डिसेंबरला दिवसभर विविध कार्यक्रम होते. त्या दरम्यान, चोरट्याने कारमधून हे रिव्हॉल्व्हर चोरुन नेले. काही वेळेने हा रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर घरातही सर्व ठिकाणी शोधले. त्यानंतर आता खडक पोलिसाकडे फिर्याद दिली आहे.