पुणे : शहरातील संरक्षण विषयक आस्थापना तसेच येथील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे वास्तव्य, संरक्षणविषयक तज्ज्ञ यांची उपलब्धता हे लक्षात घेता शहराला संरक्षणविषयक साधनसामग्रीचे स्टार्टअप आणि उत्पादन हब जाहीर करावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान केली.पुण्यात अनेक वर्षांपासून संरक्षण विषयक अनेक आस्थापना आहेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, दारूगोळा कारखाना, डीआयएटी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी यांचा त्यात समावेश आहे. निवृत्तीनंतर अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी पुण्यात स्थायिक होतात. त्याशिवाय संरक्षणविषयक साधनसामग्रीतील अनेक तज्ज्ञ पुण्यात वास्तव्यास असल्याचे शिरोळे यांनी आपल्या भाषणात सांगितले. हे लक्षात घेऊन पुणे शहराला संरक्षणविषयक साधनांच्या उत्पादनाचा स्टार्टअप हब जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.आजमितीला भारत फोर्ज व अन्य काही कंपन्या संरक्षण खात्याला शस्त्रात्रांशी संबंधित लहान मोठ्या भागांचा पुरवठा करत आहेत. त्याला व्यापक स्वरूप द्यायचे असेल तर सरकारने स्टार्ट अप हब जाहीर केल्यास या क्षेत्राशी संबधित नवउद्योजकांना त्याचा लाभ मिळू शकतो. त्यातून शहरात रोजगार उपलब्धी होऊ शकते, असे मत आमदार शिरोळे यांनी व्यक्त केले. शहराचा अर्थव्यवस्थेला त्यातून चालना मिळेल व शहराच्या विकासालाही वेग येईल, असे ते म्हणाले.
पुणे शहराला संरक्षण स्टार्ट अप हब जाहीर करावे;सिद्धार्थ शितोळेंची विधानसभेतील चर्चेदरम्यान मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:53 IST